हेलिकॉप्टर अपघातात झेकचे अब्जाधीश ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 07:22 AM2021-03-30T07:22:20+5:302021-03-30T07:22:32+5:30
अलास्कात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यात झेक प्रजासत्ताकातील अब्जाधीश पीटर केलनर (वय ५६) यांचाही समावेश आहे.
अँकरेज : अलास्कात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यात झेक प्रजासत्ताकातील अब्जाधीश पीटर केलनर (वय ५६) यांचाही समावेश आहे. फोर्ब्सच्या २०२० यादीनुसार केलनर यांच्याकडे १७ अब्ज डॉलरची संपत्ती होती. हे हेलिकॉप्टर भाड्याने घेतले होते. ते एका लॉजवरून गाइड व पाहुण्यांना नेत होते. अपघातात एक प्रवासी बचावला असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
आर्थिक, टेलिकम्युनिकेशन, इंजिनीअरिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रातील कंपन्यांच्या पीपीएफ समूहाच्या ९८.९३ टक्के शेअर्ससह त्यावर मालकी असलेली धनाढ्य व्यक्ती म्हणून केलनर ओळखले जात. युरोप, आशिया, उत्तर अमेरिकेतील २५ देशांत या समूहाचा विस्तार आहे. झेक मीडियाच्या माहितीनुसार केलनर हेली-स्कीइंगच्या सहलीवर होते. त्यांनी कॉपी मशीनच्या व्यवसायातून सुरुवात केली. नंतर १९९१ मध्ये त्यांनी पीपीएफ ग्रुपची स्थापना केली. हेलिकॉप्टर हिमखंडाजवळ कोसळण्याचे कारण समजलेले नाही. (वृत्तसंस्था)