चीनमध्ये तान्ह्या बाळांनाही घातलं जातंय हेल्मेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 07:53 AM2021-11-09T07:53:25+5:302021-11-09T07:53:32+5:30

बाळाला जितक्या लवकर ही हेल्मेट्स वापरायला तुम्ही सुरुवात कराल, तितकं चांगलं असं मानलं जातं.

Helmets are also worn by infants in China! | चीनमध्ये तान्ह्या बाळांनाही घातलं जातंय हेल्मेट!

चीनमध्ये तान्ह्या बाळांनाही घातलं जातंय हेल्मेट!

Next

आपलं मूल सुंदर असावं असं कोणाला वाटत नाही? खरं तर आपलंच मूल जगात सर्वात सुंदर असं प्रत्येकालाच वाटत असतं, पण त्यातही ते अजून सुंदर व्हावं, दिसावं, हेल्दी असावं यासाठी पालकांचा कोण आटापिटा सुरू असतो.. बाळाच्या जन्माअगोदरपासून आणि जन्मानंतर तर विचारूच नका.. त्याच्यासाठी महागड्या क्रिम्स विचारू नका, त्याच्यासाठी वेगवेगळ्या तेलांनी मालिश विचारू नका.. त्याच्यासाठी सोन्याच्या चाटणापासून ते वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा माराही सुरू असतो.. 

बाळाच्या कपड्यांचं तर, काय विचारता ! आज हा ड्रेस तर, उद्या तो ड्रेस !...
..पण आपलं मूल सुंदर दिसावं, असावं यासाठी कोणी बाळाला हेल्मेट घालत असेल? 
हो, चीनमध्ये सध्या ही फार मोठी क्रेझ आहे. अनेक पालक, त्यातही उच्चभ्रू पालक आपलं बाळ मोठेपणीही सुंदर दिसावं आणि सुंदरपणाच्या सर्व व्याख्यांमध्ये त्यानं फिट बसावं यासाठी त्याला हेल्मेट परिधान करीत आहेत. तेही अगदी बालपणी!  - पण, बाळाला का घालायचं हे हेल्मेट? 

चीनमध्ये सध्या अशी मान्यता आहे की, ज्या बाळाचं डोकं गोल ते सुंदर ! बाळाच्या डोक्याला मुख्यत्वे आकार मिळतो तो पहिल्या तीन महिन्यांत. बाळाचं डोकं गोल राहावं, ते चेपलं जाऊ नये, यासाठी त्याला हेल्मेट घालायचं! अर्थात हे हेल्मेट विशिष्ट पद्धतीनं तयार केलेलं असतं, तुलनेनं वजनाला हलकं असतं आणि बाळाला त्याचा त्रास होत नाही असं मानलं जातं. बरं, गोल डोक्याच्या बाळाची काही महिन्यांसाठीची ही हौस किती रुपयांत जाते. भारतीय चलनात विचार केला तर, यातल्या सर्वसाधारण हेल्मेट्सची किंमत सव्वातीन लाख रुपयांपेक्षाही जास्त आहे ! अर्थात ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे कमी किमतीची हेल्मेट्सही बाजारात उपलब्ध आहेत.

हे झालं हेल्मेटचं, पण, बाळाचं डोकं, कवटी गोल राहावी यासाठी इतरही अनेक प्रॉडक्ट्स बाजारात आली आहेत. त्यात बाळाच्या डोक्याला आकार देणाऱ्या खास तऱ्हेच्या मॅट्स, ऊशा.. अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. या साऱ्याच वस्तू सध्या चांगलाच गल्ला जमवताहेत.  ‘टॅन्सेन्ट न्यूज’च्या वृत्तानुसार चीनमध्ये हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात सुरू झाला तो आत्ता या ऑक्टोबर महिन्यांत. ‘गोल डोक्याचं बाळ सुंदर’ हे ब्युटी स्टँडर्ड तिथे अलीकडेच सेट झाल्यामुळे बाळाला हेल्मेट घेण्यासाठी पालकांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. गोल आकाराचे हे हेल्मेट बाळांची विकसित होणारी कवटी गोल तर, ठेवतेच, पण, मागच्या बाजूनं ती चपटी होण्यापासूनही रोखते, असा अनेक उत्पादकांचा दावा आहे. त्यामुळे पालक जास्तीत जास्त वेळ बाळाच्या डोक्यावर हे हेल्मेट कसं राहील, या प्रयत्नात असतात. 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सौंदर्याच्या या मापदंडाच्या बाबतीत काळाची चक्र संपूर्णत: उलटी फिरली आहेत. एक काळ असा होता, जेव्हा बाळाचं डोकं मागच्या बाजूनं चपटं असणं भाग्याचं प्रतीक मानलं जात होतं. त्यामुळे बाळांना मुद्दाम अशा तऱ्हेनं झोपवलं जायचं की, त्यांच्या डोक्याचा मागचा भाग चपटा राहील.. पण, हा ट्रेंड आता सपशेल मागे पडला आहे आणि ‘मागास’पणाचा मानला जात आहे. 
‘द साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या नियतकालिकानंही काही महिलांचे अनुभव सांगितले आहेत. त्यातील एक महिला आपला ‘चमत्कारी’ अनुभव सांगताना म्हणते, बाळाच्या डोक्याचा आकार गोल राहावा, तो चपटा असू नये यासाठी बाळाच्या जन्मापासूनच मी प्रयत्न करीत होते. माझ्या घरच्यांनी यासाठी मला खूप विरोध केला, पण, मी त्यांचं काहीएक ऐकलं नाही. मी बाळाला हेल्मेट घातलंच.

आज मी अतिशय खुश आहे, कारण माझ्या बाळाचं डोकं एकदम गोल गरगरीत आहे ! सात महिन्यांच्या माझ्या मुलीसाठी कस्टम मेड ‘हेड करेक्शन गिअर’चा वापर मी केला. दुसऱ्या एका महिलेनं आपला अनुभव माध्यमांशी शेअर करताना सांगितलं, जग आता बदलतं आहे. नव्या जगाबरोबर आपणही बदललं पाहिजे. जुन्या पिढीनं आपला हेका सोडला पाहिजे. सौंदर्याचे नवे मापदंड बाळांच्या आजी-आजोबांनीही माहीत करून घ्यायला हवेत. वाकडे दात सरळ होण्यासाठी किंवा अधिक सुंदर दिसण्यासाठी आपण दातांना जसे ब्रेसेस लावतो, तसेच हे हेल्मेट ! आपल्या बाळांसाठी ही सेवा उपलब्ध आहे, तर, त्याचा वापर करण्याऐवजी त्याला नाकं कशाला मुरडायची?

चपटं डोकं नकोच!

बाळाला जितक्या लवकर ही हेल्मेट्स वापरायला तुम्ही सुरुवात कराल, तितकं चांगलं असं मानलं जातं. म्हणजे बाळ साधारण तीन महिन्यांचं असल्यापासून हे हेल्मेट वापरायला सुरुवात केली तर, साधारण महिन्याभरातच फरक दिसायला लागतो आणि बाळाचं डोकं गोल व्हायला सुरुवात होते. एक महिला पालक सांगते, कोणत्याही नव्या गोष्टींवर टीका करणं सोपं आहे, पण चपट्या डोक्यामुळे महिलांना किती त्रास सोसावा लागतो आणि समाजाकडूनच त्यांना किती हिणवलं जातं हे मी स्वानुभवानं सांगू शकते. माझ्या मुलीनंही या यातनांना सामोरं जावं असं मला बिलकूल वाटत नाही. त्यामुळे काहीही झालं तरी माझ्या मुलीसाठी मी या अत्याधुनिक ‘हेडिगअर्स’चा वापर करणारच.

Web Title: Helmets are also worn by infants in China!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन