युद्धबंदी वाचविण्यासाठी मदत करा; युक्रेनची पुतीन यांना गळ
By Admin | Published: June 25, 2014 08:51 PM2014-06-25T20:51:10+5:302014-06-26T00:08:44+5:30
युद्धबंदी पाळण्याचे आदेश दिले असतानाही एक लष्करी हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याने युक्रेनच्या पाश्चात्त्य समर्थक नव्या नेतृत्वाने रशियन राष्ट्राध्यक्षांची तातडीने चर्चेची मागणी केली.
स्लाव्हयानस्क : रशिया समर्थक बंडखोरांच्या कमांडरने युद्धबंदी पाळण्याचे आदेश दिले असतानाही एक लष्करी हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याने युक्रेनच्या पाश्चात्त्य समर्थक नव्या नेतृत्वाने रशियन राष्ट्राध्यक्षांची तातडीने चर्चेची मागणी केली.
स्लाव्हयानस्क शहराजवळ युक्रेनियन लष्कराचे हेलिकॉप्टर पाडण्यात आल्यामुळे नऊ लष्करी कर्मचारी ठार झाले. याशिवाय सशस्त्र बंडखोरांच्या हल्ल्यात आणखी दोन सैनिकांचा बळी गेला. या रक्तपातानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांनी पूर्व भागात शक्तिशाली लष्करी मोहीम राबविण्याची धमकी दिली.
सव्वा लाख लोकसंख्येचे स्लाव्हयानस्क हे शहर रशिया समर्थक बंडखोरांचा गड असून, या शहराला युक्रेनियन लष्कराने वेढा घातला आहे. बुधवारी सकाळी युक्रेन लष्कराने शहरावर पुन्हा तोफमारा सुरू केल्याचे पत्रकारांनी सांगितले.
ही वादळापूर्वीची शांतता आहे. युद्धबंदी संपल्यानंतर हे वादळ पुन्हा घोंगावेल, असे एका बंडखोराने सांगितले. गेल्या ११ महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत ४३५ जणांचा बळी गेला आहे. पोरोशेन्को यांच्या प्रत्युत्तराच्या धमकीने हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी मध्यस्थी करणार्यांच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. युक्रेनने एकतर्फी युद्धबंदी लागू केली होती. बंडखोरांनी गेल्या सोमवारपासून युद्धबंदीचे पालन सुरू केले. युद्धबंदी शुक्रवारी सकाळी संपुष्टात येत आहे. युद्धबंदीच्या काळात मुत्सद्दी आघाडीवर आणखी एक निष्फळ अप्रत्यक्ष चर्चा सोडल्यास काहीही प्रगती होऊ शकलेली नाही. दरम्यान, रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी दोन्ही पक्षांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.