पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिका घेईल भारताचे साह्य, निक्की हॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 02:03 AM2017-10-19T02:03:52+5:302017-10-19T02:04:13+5:30
दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मिळणा-या समर्थनाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर धोरण अवलंबले असतानाच, पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी भारत आम्हाला मदत करू शकतो
वॉशिंग्टन : दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मिळणा-या समर्थनाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर धोरण अवलंबले असतानाच, पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी भारत आम्हाला मदत करू शकतो, असे अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅली यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या राजदूताने केलेल्या या विधानामुळे पाकिस्तान अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत अमेरिकेने दहशतवाद्यांच्या आश्रय व मदत देऊ नका, यासाठी पाकिस्तानवर दबाव आणला होता, पण आता प्रथमच त्यासाठी भारताची मदत घेण्याचे सूतोवाच भारतातर्फे करण्यात आले आहे. अफगाणिस्तानमधील भारताच्या भूमिकेला सातत्याने विरोध करणाºया पाकिस्तानला याचा धक्का बसू शकेल.
संयुक्त राष्ट्रसंघात बोलताना निक्की हॅली म्हणाल्या की, अफगाणिस्तान व दक्षिण आशियातील दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने नवी रणनीती आखली आहे. त्या रणनीतीमध्ये भारत व अमेरिका यांचा सहभाग असू शकेल. अफगाणिस्तान व दक्षिण आशियात असलेल्या दहशतवाद्यांच्या आश्रयदात्यांना संपविणे महत्त्वाचे आहे.
ते दहशतवादी अमेरिकेसाठीही त्रासदायक असून, त्यांच्या हातात कोणत्याही स्थितीत अण्वस्त्रे जाऊ नयेत, अशी आमची भूमिका आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, त्यामुळे दहशतवाद्यांना संपविण्यासाठी अमेरिका आपली सर्व प्रकारची ताकद वापरेल. (वृत्तसंस्था)
भारताचे कौतुक
अफगाणिस्तानचा आर्थिक विकास व्हावा आणि प्रगती व्हावी, यासाठी भारत करीत असलेल्या प्रयत्न व मदतीचे निकी हॅली यांनी कौतुक केले. अफगाणिस्तानला भारताच्या मदतीची गरज आहे. भारत हा त्या राष्ट्रासाठी अत्यंत भरवशाचा व चांगला शेजारी आहे, असे त्या म्हणाल्या.