इंटरनेटवर शोधलेला नवरा निघाला तिचा आजोबा!
By admin | Published: October 4, 2016 03:38 AM2016-10-04T03:38:09+5:302016-10-04T03:38:09+5:30
विवाहविषयक संकेतस्थळाच्या माध्यमातून अमेरिकेतील एका २४ वर्षांच्या युवतीने ६९ वर्षांच्या धनाढय वृद्धाशी लग्न केले खरे, पण
वाशिंग्टन : विवाहविषयक संकेतस्थळाच्या (मॅट्रिमोनियल साइट) माध्यमातून अमेरिकेतील एका २४ वर्षांच्या युवतीने ६९ वर्षांच्या धनाढ्य वृद्धाशी लग्न केले खरे, पण तो आपला सख्खा अजोबा असल्याचे तीन महिन्यांनी तिच्या लक्षात आल्यावर तिला मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे, ही गफलत झाल्याचे उघड होऊनही तिने आजोबांसोबतच त्यांची पत्नी म्हणून राहण्याचे ठरविले आहे.
अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात ही विचित्र घटना घडली. लग्नानंतर तीन महिन्यांनी हे जोडपे मियामी शहराच्या गोल्डन बीच भागातील त्यांच्या घरी जुन्या फोटोंचा अल्बम बघत बसले असता, त्यांचे खरे नाते उघड झाले. ‘प्लोरिडा सन पोस्ट’ वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, त्या अल्बममध्ये त्या वृद्धाच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलांचे फोटो होते व त्यातील एक फोटो आता त्याची पत्नी झालेल्या युवतीच्या वडिलांचा होता!
‘सन पोस्ट’च्या बातमीनुसार, या वृद्धाशी त्याच्या पहिल्या पत्नीचे पटेनासे झाल्यावर, ती मुलांना सोबत घेऊन त्याला सोडून अज्ञात स्थळी निघून गेली.
त्यानंतर, कित्येक वर्षे त्याचा या पत्नीशी किंवा तिच्यापासून झालेल्या मुलांशी संपर्कही राहिला नाही. या माणसाच्या म्हणण्यानुसार, बायको आणि मुलांचा शोध घेण्यासाठी त्याने अनेक वेळा खासगी ‘डिटेक्टिव्ह’ही कामाला लावले, पण त्यांचा काही थांगपत्ता लागला नाही.
सोडून गेलेली पहिली पत्नी व मुले सापडत नाहीत, हे पाहून या महाशयांनी दुसरे लग्न केले व तिच्यापासूनही त्याला अनेक मुले झाली. काही वर्षांनी या दुसऱ्या पत्नीनेही घटस्फोट घेतला व त्याचा त्याला मोठा आर्थिक भुर्दंड पडला. बेताच्या आर्थिक स्थितीत कसे बसे दिवस काढत असताना, दोन वर्षांपूर्वी त्याला लॉटरीत लाखो डॉलरचे बक्षीस लागले व पुन्हा लग्न करण्याचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. ‘सन पोस्ट’च्या वृत्तानुसार अनुरूप पत्नी शोधण्यासाठी त्याने लग्नासाठी स्थळे सुचविणाऱ्या एका स्थानिक एजन्सीशी (डेटिंग एजन्सी) संपर्क साधला.
तो म्हणतो, ‘त्या डेटिंग एजन्सीच्या वेबसाइटवर अनेक आकर्षक तरुण मुलींची प्रोफाइल्स व फोटो होते. हिचे फोटो पाहिले, तेव्हा मला जरा विचित्र वाटले खरे, पण मनपसंत मुलगी मिळाल्याच्या आनंदात ती आपल्या ‘ओळखीची’ असल्याचे लक्षातही आले नाही!’
दोघांची एका रेस्टॉरन्टमध्ये भेट झाली आणि दोघेही परस्परांवर फिदा झाले. त्यानंतर, दोघे वरचेवर भेटायचे आणि एकमेकांच्या कुटुंबांविषयी दोघांनी फारशी चौकशीही केली नाही. कालांतराने तिला याच्यापासून दिवस राहिले व तिच्या वडिलांनी (म्हणजे या वृद्धाच्या मुलाने) तिला घरातून हाकलून दिले. त्यानंतर, या दोघांनी लग्न केले व त्याच्या मियामीमधील घरात ते राहू लागले. ‘सन पोस्ट’ने या विचित्र विवाहबंधनात अडकलेल्या व अडकूनच राहू इच्छिणाऱ्या अनोख्या दाम्पत्याची नावे उघड केली
नाहीत.
आधीच दोन लग्ने अपयशी ठरल्याने मी आयुष्यात खूप काही भोगले आहे. आता मला या तिसऱ्या बायकोला सोडायचे नाही व मी तिला सोडणारही नाही!
- पती झालेला आजोबा
त्या फोटो अल्बममध्ये मी माझ्या वडिलांचा फोटो पाहिला, तेव्हा काही काळ मन कमालीचे विषण्ण झाले, पण आमची मने आता एवढी जुळली आहेत की, हे नाते वेगळे होण्यास पुरेसे कारण आहे, असे मला वाटत नाही!
-पत्नी झालेली नात