अपंग मुलाला पाठीवर घेऊन तिची जगभ्रमंती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 11:33 AM2022-01-11T11:33:02+5:302022-01-11T11:33:45+5:30
आत्ता या आईचं वय आहे ४३ आणि तिच्या मुलाचं वय आहे २६!
श्रावण बाळाची कथा आपल्या सर्वांनाच माहीत आहे. वृद्ध आणि अंध माता-पित्यांची तीर्थाटनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यानं एक कावड तयार केली आणि त्यात आपल्या माता-पित्यांना बसवून तो त्यांना तीर्थयात्रेला घेऊन गेला. ही कथा पुराणकाळातील असली तरी अशाच प्रकारची एक घटना नुकतीच घडली आहे. अर्थात यात थोडा बदल आहे. ऑस्ट्रेलियातील निक्की अंत्रम ही ४३ वर्षीय आई आपल्या जिम्मी या मुलाला घेऊन जगभर फिरते आहे. त्यांचं जवळपास अर्ध जग फिरुन झालं आहे आणि संपूर्ण जग फिरायची त्यांची इच्छा आहे. पण, यातील आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही आई आपल्या दिव्यांग आणि अंध मुलाला पाठीवर घेऊन जग फिरते आहे. आत्ता या आईचं वय आहे ४३ आणि तिच्या मुलाचं वय आहे २६!
तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे?, २६ वर्षाच्या एवढ्या मोठ्या मुलाला- तरुणाला पाठीवर घेऊन कोण, कसं काय फिरू शकेल?..
त्या घटनेचाही एक मोठा इतिहास आहे. दिव्यांग मूल जन्माला आल्यावर, त्या कुटुबांला, विशेषत: आईला किती दु:ख होतं, अशा मुलांची दिवसरात्र किती काळजी, मेहनत घ्यावी लागते, हे साऱ्यांनाच माहीत आहे. आपल्या पोटी दिव्यांग मुलगा जन्माला आला आहे, हे ऐकल्या-पाहिल्यावर निक्कीही प्रचंड हादरली.
भविष्यातील तिच्या साऱ्या स्वप्नांचे मनोरे धडाधड कोसळले. काही काळ ती नैराश्यातही गेली, पण, त्यानंतर ती सावरली आणि हे मूलच आता आपलं आयुष्य आहे, या जिद्दीनं त्याच्या संगोपनासाठी, त्याच्या आनंदासाठी तिनं स्वत:ला वाहून घेतलं. निक्की सांगते, जिम्मीचा जन्म झाला, तेव्हा मी केवळ १७ वर्षांची होते. तो केवळ दिव्यांग आणि दृष्टिहीनच नव्हता तर, त्याला फिटही येत होत्या. त्यामुळे मी पूर्णपणे उन्मळून पडले पण, नंतर सावरले, ते मुलाकडे पाहूनच.
‘सिंगल मदर’ असल्याने माझ्यापुढच्या समस्या अजूनच जटिल होत्या. नंतर मी स्वत:लाच विचारलं, जिम्मी निसर्गाचं सौंदर्य आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, इंद्रधनुष्यासारख्या गोष्टींची जादू तो कधीही अनुभवू शकणार नाही, बाकी मुलांसारखा तो कधीही खेळू शकणार नाही, तरीही माझ्याशी बोलताना तो किती आनंदी, हसरा असतो, मलाही आनंद देतो, तर, मी दु:खी कशी राहू शकते?, मीही जिम्मीला असंच आयुष्य देण्याचा प्रयत्न करेन, जे इतर सर्वसाधारण मुलांना मिळतं. त्याला आयुष्यभर खुश ठेवण्याची खूणगाठ मी त्याच दिवशी बांधली. त्याला खांद्यावर घेऊन अख्खं जग फिरवून आणण्यासाठी धडपडत राहिले. आजही मी ते करते आहे. त्याच्याकडे व्हीलचेअर नाही, असं नाही, पण, त्याला खांद्यावर घेऊन फिरणं मलाच जास्त आवडतं..’’
जिम्मी दिव्यांग असल्यानं त्याची पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळे वजनापासून ते इतर साऱ्या गोष्टींपर्यंत तो इतर मुलांपेक्षा कमजोरच राहिला. अनेक लोक निक्कीला म्हणतात, जिम्मी आता ‘तरुण’ झालाय, त्याचं वजनही वाढलंय, तरी त्याला पाठंगुळी घेऊन तू कशी काय फिरू शकतेस?, त्यावर निक्कीचं म्हणणं असं, चांगल्या आयुष्याचं वचन मी माझ्या मुलाला दिलं आहे. तो माझ्यासाठी कधीच ओझं नव्हता आणि नाही. त्याच्या आनंदासाठी माझ्या खांद्यांत आणि बाहूंत भरपूर बळ आहे.
जगभरात फिरताना दोन्ही मायलेकांनी फक्त प्रेक्षणीय स्थळांनाच भेटी दिल्यात, असं नाही, तर दमछाक करणाऱ्या, ट्रेकिंग करुन चढून जावं लागेल अशाही अनेक ठिकाणांनाही त्यांनी भेटी दिल्या आहेत. जेव्हा जिम्मीला पाठीवर घेऊन चालणं अशक्य होतं, त्यावेळी निक्की त्याला थोडा वेळ पाठीवरुन खाली उतरवते. काही काळ त्याला स्वत:ला चालायला सांगते. तोही त्याला जमेल तेवढं अंतर खुरडत खुरडत आनंदानं चालतो. त्यानंतर निक्की त्याला पुन्हा पाठीवर घेऊन पुढच्या प्रवासाला निघते..निक्की आपल्या मुलाला पाठीवर घेऊन बालीपासून ते पेरिशारपर्यंत अर्ध जग फिरुन आली आहे. पेरिशार हा ऑस्ट्रेलियातील बर्फाळ प्रदेश आहे. मोठमोठ्या बर्फाळ चढणी आणि उतार तिथे आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणावर स्किइंग केलं जातं. तो थरारही निक्कीनं आपल्या डोळ्यांनी जिम्मीला दाखवला आहे.
डायपर्स, कपडे आणि बेड पॅड्स..
निक्की म्हणते, अनेकदा असे प्रसंग येतात, जेव्हा आम्ही पुढे जाऊ शकत नाही, पण, हार मानणं माझ्या रक्तात नाही. भलेही जिम्मी स्वत:च्या डोळ्यांनी हे जग पाहू शकत नसेल पण, मनाच्या डोळ्यांनी तो हे जग पाहात असेल. रोज मी त्याला नवे नवे शब्दही शिकवते. जेणेकरून मी सांगितलेलं त्याला कळू शकेल. जिम्मीसाठी डायपर्स, कपडे, बेड पॅड्स, बेडशीट्स, उशा, चादरी, ब्लँकेट्स.. असा सारा जामानिमाही निक्कीला बरोबर घ्यावा लागतो. पण, हे सारं ती आनंदानं करते. कोरेानाचं वारं आता पुन्हा वाहू लागलं आहे. परत लॉकडाऊन होण्याच्या आत जिम्मीला घेऊन तिला कॅनडाला जायचं आहे.. मायलेकाची ही कहाणी सोशल मीडियावर सध्या सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आणते आहे.