अन्नासाठी हत्तींचे कळप कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांकडे; प्राणी निघाले मानवी वस्त्यांकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 01:33 AM2020-10-12T01:33:28+5:302020-10-12T01:33:54+5:30
श्रीलंकेतील छायाचित्र; रॉयल सोसायटी ऑफ बायॉलॉजीचा पुरस्कार
लंडन : एखाद्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये गुरढोरे, गाढवे, कुत्री अन्नाच्या शोधात फिरताना नेहमीच दिसतात; पण श्रीलंकेतील डम्पिंग ग्राऊंडमध्ये चक्क हत्तींचा कळप अन्नाचा शोध घेताना दिसला.
हा आगळा क्षण तिलक्सन थारमापालन या निष्णात छायाचित्रकाराने टिपला. त्यांच्या या छायाचित्राला ब्रिटनमधील रॉयल सोसायटी आॅफ बायोलॉजी या संस्थेने आयोजिल्या जाणाºया छायाचित्र स्पर्धेत यंदाच्या वर्षी पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.निसर्गचक्रामध्ये होणाºया बदलांचा माणसासह सर्वच प्राण्यांवर परिणाम होतो, तसेच माणसाच्या कृत्यांमुळे जे पर्यावरणात किंवा परिसरात जे बदल घडतात, त्याचे भलेबुरे परिणाम इतर जीवसृष्टीलाही भोगावे लागतात. तिलक्सन यांनी काढलेल्या छायाचित्रातून तेच प्रतीत होते.
श्रीलंकेतील ओलुविल याठिकाणी एक डम्पिंग ग्राऊंड आहे. सर्व कचरा तिथे साठविला जातो. नंतर त्याची विल्हेवाट लावली जाते. त्या जागी अन्नाच्या शोधात हत्तीचा कळप आल्याचे छायाचित्रात दिसून येते. ते दृश्य धक्कादायक आहे.
प्राणी निघाले मानवी वस्त्यांकडे
जंगलातील प्राण्यांच्या अधिवासावरच, असे अतिक्रमण होऊ लागल्याने हत्ती व इतर प्राणीही अन्नाच्या शोधासाठी डम्पिंग ग्राऊंडमध्ये येऊ लागले आहेत. प्राणी जंगलातून मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत.