‘गोल्ड मेडल’ विजेता उंदीरमामा मरण पावला; निधनाची बातमी ऐकून अख्खा देश हळहळला!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 09:44 AM2022-01-19T09:44:07+5:302022-01-19T09:44:24+5:30
मगावानं तब्बल पाच वर्षे कंबोडियाच्या सरकारी सेवेत इमानेइतबारे काम केलं. आठव्यावर्षी त्याचं निधन झालं. आपल्या कारकीर्दीत त्यानं कंबोडियात तब्बल शंभरपेक्षाही जास्त भूसुरुंग शोधून काढले आणि इतरही स्फोटकांचा शोध लावला.
गुन्हे आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी, भूसुरुंग आणि बॉम्ब शोधण्यासाठी, ढिगाऱ्याखाली दबलेली माणसं जिवंत बाहेर काढण्यासाठी ‘स्निफर डॉग्ज’चा किती उपयोग होतो, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळेच अशा कुत्र्यांना पोलीस, रेस्क्यू टीम आणि संरक्षण व्यवस्थेत आवर्जून सामील करून घेतलं जातं. त्यांच्यामुळे केवळ किचकट गुन्हे आणि नामचिन गुंडच शोधले गेले नाहीत, तर हजारो लोकांचे प्राणही या कुत्र्यांनी आजवर वाचविले आहेत.
पण हेच काम जर एखादा उंदीर करीत असेल तर? हो, कंबोडियामध्ये असाच एक ‘गोल्ड मेडल’ विजेता ‘मगावा’ नावाचा उंदीरमामा होता. आजवर त्यानं हजारो लोकांचे प्राण वाचविले आहेत, हाच मगावा कंबोडियाच्या सरकारी खात्यातून सन्मानाने निवृत्त झाल्यानंतर त्याची कहाणी याच सदरात आपण वाचली होती, पण मगावा आता या जगात राहिलेला नाही. नुकतंच त्याचं निधन झालं. त्याच्या निधनानं कंबोडियाच्या पोलिसांना आणि सुरक्षा दलाला अतीव दु:ख झालं आहे. इतका कामसू आणि प्रामाणिक साथीदार आपल्याला आता परत मिळणार नाही, म्हणून त्यांचे डोळे अक्षरश: पाणावले.
मगावानं तब्बल पाच वर्षे कंबोडियाच्या सरकारी सेवेत इमानेइतबारे काम केलं. आठव्यावर्षी त्याचं निधन झालं. आपल्या कारकीर्दीत त्यानं कंबोडियात तब्बल शंभरपेक्षाही जास्त भूसुरुंग शोधून काढले आणि इतरही स्फोटकांचा शोध लावला. त्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले. कम्बोडियातील गृहयुद्धादरम्यान जंगलात आणि रस्त्यांखाली हजारो भूसुरुंग पेरले गेले होते. या परिसरातून जाणाऱ्या लोकांचा पाय त्यावर पडला की, त्यांचा स्फोट होऊन आजवर हजारो लोक जखमी झाले आणि कित्येक मृत्युमुखी पडले आहेत.
कंबोडियात जगप्रसिद्ध अंकोरवाट मंदिर आहे. नैसर्गिकदृष्ट्याही हा देश अतिशय संपन्न आहे. त्यामुळे जगभरातून पर्यटक येथे येत असतात, पण त्यातील अनेकांना या भूसुरुंग स्फोटात आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कंबोडियाचं नाव बदनाम होत होतं आणि पर्यटकही तेथे यायला घाबरत होते. त्यावर उपाय म्हणूनच कंबोडिया सरकारनं हे भूसुरुंग शोधून काढण्याची मोहीम गेल्या काही वर्षांपासून हाती घेतली आहे. त्यात मगावा या उंदीरमामाची त्यांना खूप मदत झाली.
बेल्जियम येथील धर्मादाय संस्था ‘अपोपो’ यांनी मगावा दोन वर्षांचा असताना त्याला टांझानिया येथून आणलं आणि त्याला प्रशिक्षण दिलं. यात मगावानं थक्क करणारी प्रगती केली होती. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अत्यंत संवेदनशील अशा तब्बल दोन लाख २५ हजार चौरस मीटर क्षेत्रातील भूसुरुंग त्यानं शोधून काढले. हा भूभाग साधारण ४२ फुटबॉल मैदानांइतका होतो. मगावा उंदीर जमातीतला असला तरी, इतर उंदरांपेक्षा तो वेगळा आणि ‘बलदंड’ होता. त्याचं वजन साधारण १.२ किलो, तर लांबी ७० सेंटिमीटर होती. मगावा वजनानं ‘भारी’ असला तरी, त्याचं वजन इतकंही जास्त नव्हतं, की त्याच्या वजनानं एखादा भूसुरुंग फुटू शकेल. त्यामुळे त्याठिकाणी उकरून, आपल्याबरोबरच्या स्वयंसेवकांना तो सावध करीत असे. त्यानंतर रेस्क्यू टीममधले मगावाचे सहकारी हा भूसुरुंग नष्ट करीत असत.
मगावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एका टेनिस कोर्टच्या आकाराचा परिसर केवळ वीस मिनिटांत तो तपासून काढत असे. त्या ठिकाणी भूसुरुंग पेरलेला आहे की नाही, हे त्याला लगेच कळत असे. तेवढाच परिसर मेटल डिटेक्टरच्या साहाय्यानं तपासताना सुरक्षा रक्षकाला जवळपास चार दिवस लागत!
२०२० मध्ये मगावाला ‘पीडीएसए’ (पीपल्स डिस्पेन्सरी फॉर सिक ॲनिमल्स) गोल्ड मेडल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. प्राणी किंवा माणसांचे जीव वाचवताना स्वत:चा जीव धोक्यात घालून असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या प्राण्यांना हा मानाचा शौर्य पुरस्कार दिला जातो. यापूर्वी कुत्रा, घोडे यासारख्या प्राण्यांना हा पुरस्कार मिळाला असला, तरी गेल्या ७७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या उंदराला हा पुरस्कार मिळाला होता. मगावा थकत चालल्यानं गेल्यावर्षी जूनमध्ये त्याला सन्मानानं सेवानिवृत्त करण्यात आलं . मगावाला एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाप्रमाणे मानमरातब आणि तशा सेवाही देण्यात आल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपर्यंत मगावाची तब्येत उत्तम होती, पण अचानक तो थकल्यासारखा वाटायला लागला. जास्त झोपायला लागला आणि खाण्यातला त्याचा इंटरेस्टही संपला. त्यातच त्याचा अंत झाला. कुठल्याही वेदनांशिवाय शांतपणे त्याला मृत्यू आला, असं त्याच्या ‘चाहत्यां’नी आणि सोबत्यांनी भावुकपणे सांगितलं. मगावाच्या जाण्यानं अख्खा देश हळहळला.
मगावाला आमचा मनापासून प्रणाम !...
मगावाच्या मृत्यूनंतर धर्मादाय संस्था ‘अपोपो’, पोलीस आणि सुरक्षा दलांनी त्याच्याविषयी आदर व्यक्त करताना एक परिपत्रकच काढलं. त्यात म्हटलं आहे, मगावाचे आम्ही आयुष्यभराचे ऋणी आहोत. दुर्घटनेचा वास घेण्याच्या त्याच्या अपूर्व क्षमतेमुळे कंबोडियाचे हजारो लोक बिनधास्तपणे आपल्या कामावर जाऊ शकले, हिंडू-फिरू शकले, जिवाच्या भीतीशिवाय आपलं आयुष्य जगू शकले.. मगावाला आमचा मनापासून प्रणाम !...