लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 11:26 AM2024-09-25T11:26:34+5:302024-09-25T11:27:55+5:30
Hezbollah vs Israel, Fadi 3 Missile: हिज्बुल्लाने इस्रायलच्या लष्करी तळावर फादी-३ मिसाइलचा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
Hezbollah vs Israel, Fadi 3 Missile: इस्रायली सैन्याने लेबनानमधील हिजबुल्लाच्या सैनिकांवर प्राणघातक हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये ५०० हून अधिक लोक मारले गेले. इस्रायलच्या एअरस्ट्राइकनंतर हिजबुल्लानेही इस्रायलवर निशाणा साधला आहे. इस्रायलविरुद्ध नवीन रॉकेट वापरण्याची घोषणा त्यांनी केली आहे. हिजबुल्लाने एका हल्ल्यात नवीन रॉकेट फादी-3 वापरल्याचे म्हटले आहे. त्यांनी इस्रायली लष्करी तळाला टार्गेट केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, फादी-3 रॉकेट किती प्राणघातक आहे याबाबत हिजबुल्लाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
इराणची वृत्तसंस्था मेहरने दिलेल्या माहितीनुसार, या रॉकेटच्या फादी-२ आवृत्तीमध्ये १७० किलो वजनाचे वॉरहेड (पुढची बाजू) होते. त्याची रेंज १०० किलोमीटर होती. हे फादी-१ पेक्षा जास्त शक्तिशाली रॉकेट होते. फादी-१ मध्ये ८३ किलो वजनाचे वॉरहेड होते. त्याची रेंज ७० किलोमीटर होती. त्यामुळे अद्ययावत फादी-३ मध्ये सुमारे २३० किलो वजनाचे वॉरहेड आणि सुमारे १२५ किमी रेंज असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, सोमवारी पहाटे लेबनानमध्ये हवाई हल्ले सुरू झाले होते. यामध्ये आतापर्यंत ५५८ लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये ५० मुले आणि ९४ महिलांचा समावेश आहे. लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. आरोग्य मंत्री फिरास अबियाद यांनी मंगळवारी सांगितले की, या हल्ल्यांमध्ये १,८३५ लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये चार वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे.