हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 10:26 PM2024-09-26T22:26:07+5:302024-09-26T22:26:39+5:30
Israel Hezbollah War : इस्रायलने हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर मोठा हवाई हल्ला केला.
Israel Hezbollah War : तेल अवीव : इस्रायली लष्कराने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर मोठा हवाई हल्ला केला. दरम्यान, इस्त्रायली लष्कराने दावा केला आहे की, बेरूतच्या उपनगरातील एका अपार्टमेंट इमारतीवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा ड्रोन कमांडर ठार झाला आहे. मोहम्मद हुसेन सुरूर असे ठार झालेल्या कमांडरचे नाव आहे. मात्र, हिजबुल्लाहने इस्रायलच्या दाव्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
बेरूतच्या उपनगरात हवाई हल्ला
इस्रायलने हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर मोठा हवाई हल्ला केला. लेबनॉनच्या हिजबुल्लाह गटाच्या टीव्ही स्टेशनने बेरूतच्या उपनगरात इस्रायली हवाई हल्ल्याचे वृत्त दिले आहे. अल-मनार टीव्हीने मात्र हल्ल्याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र, इस्त्रायली लष्कराने बेरूतच्या दक्षिणेवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.
यापूर्वी मिसाइल युनिटचा वरिष्ठ कमांडर ठार
इस्रायली लष्कराने लेबनानमधील हिजबुल्लाहच्या सैनिकांवर प्राणघातक हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये ५०० हून अधिक लोक मारले गेले.दोन दिवसांपूर्वी इस्त्रायली लष्कराने अशाच हल्ला केला होता. त्यात हिजबुल्लाहच्या मिसाइल युनिटचा वरिष्ठ कमांडर ठार झाला होता.
सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी
दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारमधील एका घटक पक्षाने हिजबुल्लाहसोबत कायमस्वरूपी युद्धविराम झाल्यास सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. ज्यू पॉवर पक्षाचे प्रमुख इटामार बेन-ग्वीर यांनी तात्पुरता करार झाल्यास युतीबरोबरचे सहकार्य स्थगित करण्याची धमकी दिली. ते म्हणाले "तात्पुरती युद्धबंदी कायमस्वरूपी झाली तर आम्ही सरकारचा राजीनामा देऊ."