बेंजामिन नेतन्याहू यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचलं हिजबुल्लाहचं ड्रोन, पण...! इस्रायलचं टेन्शन वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 03:45 PM2024-10-23T15:45:34+5:302024-10-23T15:47:41+5:30
या हल्ल्याचा एक फोटोही समोर आला आहे, यावरून हिजबुल्लाहच्या धाडसीपणाचा अंदाज येऊ शकतो. नेतन्याहू यांच्या बेडरूमवर कशा पद्धतीने हल्ला झाला, हे फोटोवरून स्पष्ट होते.
इस्रायलचे हमास आणि हिजबुल्लाहसोबत सुरू असलेले युद्ध सातत्याने तीव्र होताना दिसत आहे. आता गेल्या शनिवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला. हिजबुल्लाहने थेट त्यांच्या घरावर ड्रोन हल्ला केला होता. मात्र यात त्यांना कसल्याही प्रकारची इजा झाली नाही. हल्ल्या वेळी नेतान्याहू हे त्यांच्या निवासस्थानी नव्हते.
दरम्यान, या हल्ल्याचा एक फोटोही समोर आला आहे, यावरून हिजबुल्लाहच्या धाडसीपणाचा अंदाज येऊ शकतो. नेतन्याहू यांच्या बेडरूमवर कशा पद्धतीने हल्ला झाला, हे फोटोवरून स्पष्ट होते. या हल्ल्यात त्याच्या बेडरूमच्या खिडकीचे नुकसान झाले आहे. यावरून स्पष्ट होते की, हिजबुल्लाहचा निशाना अगदी अचूक होता त्यांचे ड्रोन नेतन्याहू यांच्य बेडरूमपर्यंत पोहोचले होते.
या हल्ल्यात बेंजामिन नेतन्याहू यांना इजा झाली नाही. मात्र, असा एखादा अचूक हल्ला भविष्यात झाला तर मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती इस्रायली यंत्रणांना वाटू लागली आहे. हे ड्रोन लेबनॉनमधून उडवण्यात आले होते, ते थेट बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाच्या बेडरूमच्या खिडकीवर धडकले. या ड्रोन हल्ल्यात घराच्या खिडकीचे कसे नुकसान झाले, हे संबंधित फोटोत दिसत आहे. ड्रोन हल्ल्यात खिडकीची काच फुटली आहे. मात्र, ते आत जाऊ शकले नाही. कारण संबंधित काच अत्यंत मडजबूत होती आणि प्रोटेक्शनसाठी इतरही काही गोष्टी होत्या.
या हल्ल्यात कुणीही जखमी झालेले नाही. हल्ला झाला तेव्हा बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांची पत्नी निवासस्थानी नव्हते. या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहने एक निवेदन जारी करत आमचे ऑपरेशन यशस्वी झाले आणि थेट हल्ला केला, असे म्हटले आहे. या प्रकरणापासून इराणने दूर राहणे पसंत केले आहे. मात्र इस्रायलच्या पंतप्रधानांनी त्यांच्यावर थेट आरोप केला आहे. हे काम इराणच्या एजंट्सनीच केले असल्याचे नेतन्याहू यांनी म्हटले आहे.