रोहिंग्यांची सर्वात जास्त संख्या जम्मू आणि काश्मीरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 12:25 PM2017-08-10T12:25:17+5:302017-08-10T12:39:28+5:30

भारतामध्ये 40 हजार रोहिंग्या स्थलांतरित झालेले असून त्यातील 5700 रोहिंग्या जम्मू आणि काश्मीर राज्यात राहात असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

The highest number of Rohingyas in Jammu and Kashmir | रोहिंग्यांची सर्वात जास्त संख्या जम्मू आणि काश्मीरमध्ये

रोहिंग्यांची सर्वात जास्त संख्या जम्मू आणि काश्मीरमध्ये

Next
ठळक मुद्देरोहिंग्या म्यानमारमधील राखिने प्रांतातील असून तेथिल बौद्ध धर्मियांशी झालेल्या अंतर्गत वादानंतर त्यांनी म्यानमार सोडून जाण्यास सुरुवात केली.म्यानमारमध्ये 10 ते 13 लाख रोहिंग्या असावेत, त्यानंतर 4 लाख रोहिंग्या सोदी अरेबियात, 3 लाख बांगलादेशात, पाकिस्तानात 2 लाख, थायलंडमध्ये 1 लाख आणि मलेशियात 40 हजार रोहिंग्या आहेत.

नवी दिल्ली, दि.10- म्यानमारमधून भारतामध्ये 40 हजार रोहिंग्या स्थलांतरित झालेले असून जम्मू काश्मीर राज्यामध्ये सर्वात जास्त संख्येने रोहिंग्या राहात असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरन रिजिजू यांनी दिली. रोहिंग्यांची संख्या दोन वर्षांमध्ये चौपटीने वाढल्याची माहितीही त्यांनी राज्यसभेत बोलताना दिली.

भारतामध्ये आलेल्या रोहिंग्यांबाबतीत बोलताना किरेन रिजीजू म्हणाले, गृहखात्याने सर्व राज्यांना आपल्या प्रदेशात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या लोकांना परत पाठवण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याची सूचना केलेली आहे. गृहखात्याच्या माहितीनुसार सर्वात जास्त म्हणजे 5,700 रोहिंग्या जम्मू काश्मीरमध्ये राहात आहेत आणि त्यांची संख्या 10 हजारावर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर रोहिंग्यानी हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मणिपूर येथे आश्रय घेतलेला आहे.

रोहिंग्या आणि बांगलादेशी यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची निर्वासित छावणी स्थापन केली नसल्याचे स्पष्ट करुन रिजिजू म्हणाले, ओडिशा आणि तामिळनाडूमधील 107 छावण्या श्रीलंकेतून आलेल्या निर्वासितांसाठी असून इतरत्र तिबेटीयन नागरिकांसाठी छावण्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

म्यानमारमध्ये उडालेल्या वांशिंक चकमकींनंतर रोहिंग्यांनी शेजारील देशांमध्ये स्थलांतरास सुरुवात केली. यामध्ये सर्वात प्रथम शेजारील बांगलादेशामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र बांगलादेशानेही हात झटकल्यावर समुद्रमार्गाने रोहिंग्यांनी स्थलांतर सुरुच ठेवले. यातील बहुतांश रोहिंग्या थायलंड, मलेशिया, इंडोनेशियामध्ये स्थलांतरित झाले. मात्र रोहिंग्याला स्वीकारण्यासाठी कोणत्याच देशाने उत्सुकता दर्शवली नव्हती. कित्येक बोटींना किनाऱ्यावरती उतरण्यास मज्जावही करण्यात आला. त्यामुळे या देशाच्या किनाऱ्यापासून ते दुसऱ्या देशाच्या किनाऱ्यापर्यंत आसरा शोधण्यासाठी रोहिंग्यांचा पिंगपॉंग सुरु झाला. लहानशा बोटींवर शेकडो रोहिंग्या लादून त्यांना दुसऱ्या देशात पोहोचवणाऱ्या मानवी तस्करांनी यामध्ये रोहिंग्यांची लूटही केली. अन्न पाण्याविना समुद्रातच रोहिंग्यांना आपले प्राणही गमवावे लागले होते.


दोन वर्षांपुर्वी बंगालच्या उपसागरामध्ये भरकटलेल्या काही बोटींमधील रोहिंग्यांला भारतीय नौदल आणि संरक्षक दलांनी वाचवले होते. संयुक्त राष्ट्राने रोहिंग्यांच्या अवस्थेची गंभीर दखल घेऊन त्यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याबद्दल म्यानमार सरकारविरोधात अहवालही तयार केला होता. मात्र म्यानमार सरकारने तो फेटाळून लावला.

रोहिंग्या कोण आहेत...
रोहिंग्या म्यानमारमधील राखिने प्रांतातील असून तेथिल बौद्ध धर्मियांशी झालेल्या अंतर्गत वादानंतर त्यांनी म्यानमार सोडून जाण्यास सुरुवात केली. काही इतिहास अभ्यासकांच्या मते रोहिंग्या मुळचे राखिने प्रांतातीलच आहेत मात्र काही अभ्यासकांच्या मते ते बांगलादेश मुक्तीलढ्याच्या वेळेस बांगलादेशातून तेथे स्थायिक झाले असावेत. रोहिंग्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असून त्यांचे उत्पन्नही अत्यंत तुटपुंजे आहे. म्यानमार आणि बांगलादेशाने त्यांची जबाबदारी एकमेकांवर टाकण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांना कोणताच आसरा उरला नाही. मानवी तस्करांनी त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून जबर पैसे उकळून धोकादायक मार्गांनी आग्नेय आशियातील देशांमध्ये पोहोचवण्यास सुरुवात केली. आजवरच्या आकडेवारीनुसार म्यानमारमध्ये 10 ते 13 लाख रोहिंग्या असावेत, त्यानंतर 4 लाख रोहिंग्या सोदी अरेबियात, 3 लाख बांगलादेशात, पाकिस्तानात 2 लाख, थायलंडमध्ये 1 लाख आणि मलेशियात 40 हजार रोहिंग्या आहेत.

Web Title: The highest number of Rohingyas in Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.