ड्रॅगनची नवी चाल! अरुणाचल सीमेजवळ चीनने बांधला महामार्ग; भारताच्या सुरक्षेला मोठं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 06:48 AM2021-05-22T06:48:34+5:302021-05-22T06:49:12+5:30
दोन किलोमीटरचा बोगदाही, हा महामार्ग बहुधा बाइबंग प्रांतात जाऊन संपतो. हा प्रांत अरुणाचल प्रदेशच्या बिशिंग गावाच्या सीमेजवळ आहे.
बीजिंग : गलवान खोऱ्यात गेल्यावर्षी झालेल्या हिंसक संघर्षानंतर सैन्य मागे घेतल्याचा दावा करणाऱ्या चीनने आता अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ हालचालींना वेग दिला आहे. चीनने तिबेटच्या ईशान्येकडील दूर भागात महामार्ग बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. हा भाग अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ असून, भारताच्या सुरक्षेसाठी आव्हान बनू शकतो. या महामार्गावर दोन किलोमीटर लांब बोगदाही समाविष्ट आहे.
हा महामार्ग बहुधा बाइबंग प्रांतात जाऊन संपतो. हा प्रांत अरुणाचल प्रदेशच्या बिशिंग गावाच्या सीमेजवळ आहे. बिशिंग गाव अरुणाचल प्रदेशच्या गेलिंग सर्कलमध्ये मोडते. ते मॅकमोहन सीमेला स्पर्श करते. मॅकमोहन लाईन चीन आणि भारत यांच्यात प्रत्यक्ष सीमा चिन्हित
करते. चीन अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग समजत नाही आणि तो दक्षिण तिबेटमध्ये मोडतो, असा दावा करतो.हा महामार्ग भारतासोबत प्रत्यक्ष नियंंत्रण रेषेजवळ (एलएसी) रस्ते आणि बोगद्यांच्या निर्मितीच्या चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा भाग आहे. यामुळे चीनमधील दूर अंतरावरील भागही शहरे आणि विमानतळांशी जोडले जातील.
महामार्गामुळे काय परिणाम होणार?
महामार्ग सुरू झाल्यामुळे आता तिबेटचे शहरी भाग निंगची आणि सीमेला खेटून असलेले गाव यांच्यातील प्रवास फक्त आठ तासांचा असेल. असे समजले जाते की, चीनचा मोठ्या यारलुंग जांग्बो हायड्रो-पाॅवर प्रोजेक्टची योजना बनवण्यातही हा महामार्ग मोठी भूमिका पार पाडेल. तिबेटची यारलुंग जांग्बो नदी ही भारतात वाहून आल्यावर अरुणाचल प्रदेशमध्ये सियांग आणि आसाममध्ये ब्रह्मपुत्र नदी बनते. येथून ही नदी बांगलादेशात जाते.