महिना उलटला तरीही अपहृत मुली दहशतवाद्यांच्या कैदेत
By admin | Published: May 15, 2014 03:21 AM2014-05-15T03:21:58+5:302014-05-15T03:21:58+5:30
नायजेरियातील शाळकरी मुलींचे सामूहिक अपहरण होऊन आता महिना उलटला असून, बोको हराम दहशतवाद्यांनी अजूनही मुलींना आपल्या कैदेत ठेवले आहे.
अबुजा : नायजेरियातील शाळकरी मुलींचे सामूहिक अपहरण होऊन आता महिना उलटला असून, बोको हराम दहशतवाद्यांनी अजूनही मुलींना आपल्या कैदेत ठेवले आहे. नायजेरिया सरकार मुलींसाठी दहशतवाद्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. नायजेरियाचे संसद सदस्य व अध्यक्ष गुडलक जोनाथन बोको हराम दहशतवाद्यांशी वाटाघाटी करण्यास तयार आहेत; पण गेल्यावर्षी ज्या राज्यात दहशतवाद्यांनी हिंसाचाराचा धुमाकूळ घातला तेथील आणीबाणी आणखी सहा महिने वाढवली जाणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून हिंसाचार व बॉम्बहल्ले करणार्या बोको हराम संघटनेने बोर्नो राज्यातील चिबॉक येथील शाळेतून १४ एप्रिल रोजी २७६ मुलींचे अपहरण केले आहे. नायजेरियाची आर्थिक राजधानी लागोस येथे मुलींच्या अपहरणाविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. तर २२३ मुलींच्या पालकांनी आमच्या मुली नक्की घरी कधी परतणार हे स्पष्ट करा अशी मागणी केली आहे. संयुक्त राष्टÑानेही मुलींच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. गेल्या सोमवारी बोको हरामने व्हिडिओ प्रसिद्ध करून १३० मुली दाखविल्या. (वृत्तसंस्था)