हिलरी, डोनाल्ड ट्रम्प उमेदवारीच्या जवळ
By admin | Published: March 17, 2016 03:35 AM2016-03-17T03:35:27+5:302016-03-17T03:35:27+5:30
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या उमेदवारीचे इच्छुक असलेल्या हिलरी क्लिंटन (डेमोक्रॅटिक पक्ष) आणि डोनाल्ड ट्रम्प (रिपब्लिकन) उमेदवारी मिळविण्याच्या जवळ
क्लिव्हलँड : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या उमेदवारीचे इच्छुक असलेल्या हिलरी क्लिंटन (डेमोक्रॅटिक पक्ष) आणि डोनाल्ड ट्रम्प (रिपब्लिकन) उमेदवारी मिळविण्याच्या जवळ गेले आहेत. अनेक राज्यांमधील महत्त्वाची समजली जाणारी प्राथमिक मते या दोघांनी जिंकली आहेत. क्लिंटन व ट्रम्प यांच्यामध्येच ही निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडातील निर्णायक अशा स्पर्धेसह किमान तीन रिपब्लिकन स्पर्धा भरीव मतांनी जिंकल्या आहेत. फ्लोरिडातील त्यांचा विजय त्यांचे स्पर्धक व तेथील सिनेटर मार्को रुबियो यांना या स्पर्धेतून बाद करणारा ठरला. मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवसायात मोठे नाव कमावलेले ट्रम्प (६९) यांनी फ्लोरिडा, इलिनोईस आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये उत्तम विजय मिळवला; परंतु त्यांना त्यांच्याच राज्यात ओहियोमध्ये गव्हर्नर जॉन कॅसिक यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
हिलरी क्लिंटन (६८) यांनी फ्लोरिडा आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये स्पर्धक बर्नी सँडर्स यांच्यावर मोठे विजय मिळविले व ओहियो आणि इलिनोईस राज्यात सँडर्स यांच्यावर महत्त्वाचे म्हणता येतील असे यश प्राप्त केले. क्लिंटन आणि ट्रम्प यांनी त्यांच्या नजीकच्या स्पर्धकांवर चांगले विजय मिळविले असले तरी आपापल्या पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी लागणारे डेलिगेटस् त्यांना अजून मिळवता आलेले नाहीत. दरम्यान, फ्लोरिडात दारुण पराभव झाल्याने अमेरिकी अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून रिपब्लिकन पक्षाचे पोस्टर बॉय मार्को रुबियो यांनी माघार घेतली. (वृत्तसंस्था)