हिलरी क्लिंटन आणि वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2016 06:47 AM2016-11-09T06:47:11+5:302016-11-09T06:47:11+5:30
वॉलस्ट्रीटशी, भांडवलदारांशी त्यांची जवळीक, देशी विदेशी गुंतवणूकदारांची बिल क्लिंटन यांच्या संस्थेतली गुंतवणूक यांमुळं हिलरी यांच्याविषयी अनेकांच्या मनात संभ्रमही तयार झाला
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 8 - अमेरिका राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणारी पहिला महिला होण्याची संधी हिलरी क्लिंटन यांच्याकडे आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यापासून हिलरी क्लिंटन यांचं नाव आघाडीवर असून त्यांच्याबाबत सकारात्मक वातावरण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील त्यांना कडवं आव्हान दिल्याने निवडणूक रंगत आहे. ट्रम्प यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा हिलरी क्लिंटन यांना फायदा मिळत असताना, हिलरी यांनाही काही वादांना सामोरे जावे लागलं आहे. यामधील खासगी ईमेल प्रकरणामुळे त्या अडचणीत सापडण्याची शक्यता होती.
वॉलस्ट्रीटशी, भांडवलदारांशी त्यांची जवळीक, देशी विदेशी गुंतवणूकदारांची बिल क्लिंटन यांच्या संस्थेतली गुंतवणूक यांमुळं हिलरी यांच्याविषयी अनेकांच्या मनात संभ्रमही तयार झाला. लिबियातल्या बंगाझीमध्ये अमेरिकन दूतावासावर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीतून त्या नुकत्याच बालंबाल बचावल्या आहेत. सेक्रेटरी ऑफ स्टेट या पदावर असताना कार्यालयीन कामासाठी हिलरी यांनी केलेला खासगी ईमेलचा वापरही वादाचा मुद्दा बनला. हिलरी यांनी त्यामुळं देशाची सुरक्षितता धोक्यात टाकल्याचाही आरोप झाला.
क्लिंटन फाउंडेशन वाद -
बिल क्लिंटन यांनी चालू केलेल्या विना नफा तत्त्वावरील क्लिंटन फाउंडेशनचा. या फाउंडेशनमध्ये अमेरिकन आंतरराष्ट्रीय राजकारणासंदर्भात अडचण येऊ शकते, अशा व्यक्तींकडून, कंपन्यांकडून पैसे घेतलेले होते. या दोन्ही गोष्टींमुळे आणि इतर अशाच काही प्रसंगांमुळे हिलरी क्लिंटनबाबत विश्वासार्हता अत्यंत कमी आहे.
खासगी ईम-मेल वापर वाद -
सेक्रेटरी ऑफ स्टेट या पदावर असताना कार्यालयीन कामासाठी हिलरी यांनी केलेला खासगी ईमेलचा वापरही वादाचा मुद्दा बनला. हिलरी यांनी त्यामुळं देशाची सुरक्षितता धोक्यात टाकल्याचाही आरोप झाला. मात्र एफबीआयने एक दिवस आधी क्लीन चीट दिल्याने हिलरी यांनी सुटकेचा निश्वास टाकला. 'माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या खासगी ई-मेल सर्व्हरच्या वापराची तपासणी पूर्ण झाली असून हिलरींविरुद्ध कुठलेही गुन्हेगारी प्रकरण दाखल करता येणार नाही', असं एफबीआयचे संचालक जेम्स कोमी यांनी म्हटले.
काय आहे वाद -
बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री होत्या. या काळात त्यांनी एका खासगी ईमेल सर्व्हरच्या माध्यमातून हजारो ईमेल केल्याचे समोर आले होते. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने परराष्ट्र मंत्र्यांनी खासगी सर्व्हरचा वापर करणे गैर असल्याने क्लिंटन या अडचणीत सापडल्या. या प्रकरणी एफबीआयने तपासही केला. वॉशिंग्टन पोस्टचे राजकीय संपादक जोस ए डेलरियल यांनी ट्विटरवर हिलरी क्लिंटन यांच्या २०११ मधील ईमेलचा तपशील उघड केला होता.
हिलरी यांनी अधिकृत कामासाठी त्यांनी सरकारी ईमेल वापरला नाही आणि त्या ईमेल्सचा साठादेखील सरकारी संगणकीय सर्व्हरवर करून देण्याऐवजी घरी खासगी सर्व्हरवर केला. त्यातून अनेक आरोप झाले आणि जेव्हा ईमेल्स या चौकशी समितीस देण्याची वेळ आली, तेव्हा जवळपास 33,000 ईमेल्स आधीच काढून टाकल्याचं सांगण्यात आलं.
ईमेलमध्ये अमिताभ बच्चन यांचा उल्लेख -
हिलरी क्लिंटन यांनी त्यांच्या सहकारी हुमा अबेदिन यांना ईमेल पाठवला होता. ‘आपण काही वर्षांपूर्वी भारतातील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याला भेटलो होतो. त्यांचे नाव काय ?’ असं हिलरी यांनी विचारलं होतं. यावर अबेदिन यांनी ‘अमिताभ बच्चन’ असं उत्तर दिलं होतं. २०११ मध्ये हा ईमेल पाठवण्यात आला होता. पण हा प्रश्न का विचारण्यात आला, क्लिंटन आणि बच्चन यांची भेट कधी झाली होती हे मात्र समजू शकले नाही.
अबेदिन यांचे पती अँथनी वेनर यांच्या लॅपटॉपची तपासणी करण्यात आली. यामध्ये सुमारे ६ लाख ५० हजार ईमेल होते.
जनमत चाचणीवर परिणाम -
या घोटाळ्याची चौकशी सुरु होताच क्लिंटन यांच्या प्रतिमेला तडा गेला. या वादामुळे जनमत चाचणीत ट्रम्प यांना आघाडी मिळू लागली होती. यात ट्रम्प यांना ४६ तर क्लिंटन यांना ४५ टक्के मतदारांनी पसंती दर्शवली होती. ईमेल घोटाळ्यामुळेच हिलरी क्लिंटन यांना हा फटका बसल्याचे सांगितले जात होते.