"कमला हॅरिस ह्या हिलेरी क्लिंटन यांच्या मोलकरीण", तुलसी गबार्ड यांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 08:25 PM2024-07-22T20:25:43+5:302024-07-22T21:52:28+5:30
US President Election 2024: अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या माजी सदस्या तुलसी गबार्ड (Tulsi Gabbar) यांनी कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. त्यांनी कमला हॅरिस यांचा उल्लेख हिलेरी क्लिंटन (Hillary Clinton) यांच्या मोलकरीण असा केला आहे.
अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेतल्याने आता डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल, याबाबत आडाखे बांधले जात आहेत. त्यामध्ये अमेरिकेच्या विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचं नाव आघाडीवर आहे. तसेच जो बायडन यांनीही त्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. मात्र त्यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. दरम्यान, अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या माजी सदस्या तुलसी गबार्ड यांनी कमला हॅरिस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. त्यांनी कमला हॅरिस यांचा उल्लेख हिलेरी क्लिंटन यांच्या मोलकरीण असा केला आहे.
तुलसी गबार्ड यांनी कमला हॅरिस यांच्या उमेदवारीच्या वृत्तांबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, जर कमला हॅरिस ह्या राष्ट्रपती बनल्या तर ती अमेरिकेसाठी एक धोकादायक बाब असेल. कमला हॅरिस ह्या राष्ट्राध्यक्ष आणि लष्कर प्रमुख बनण्यासाठी पात्र नाहीत. दरम्यान, तुलसी गबार्ड यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी आपला पाठिंबा डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीर केला आहे.
याबाबत प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओमध्ये तुलसी गबार्ड म्हणाल्या की, बायडन बाहेर, कमला हॅरिस आत, मात्र तुम्ही फसू नका, धोरणात बदल होणार नाही. ज्याप्रमाणे बायडन हे स्वत: निर्णय घेत नव्हते. त्याप्रमाणे कमला हॅरिस ह्या सुद्धा स्वत: निर्णय घेणार नाहीत. त्या डीप स्टेटचा नवा चेहरा आहेत आणि युद्धखोर दलालांच्या सरदार असलेल्या हिलेरी क्लिंटन यांच्या नोकर आहेत. हे लोक संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईत लोटण्याचा आणि आपल स्वातंत्र्य हिरावण्याचा प्रयत्न सुरू ठेवतील, अला आरोप तुलसी गबार्ड यांनी केला.