दुसऱ्या फेरीनंतरही हिलरींची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2016 04:47 AM2016-10-11T04:47:09+5:302016-10-11T04:47:09+5:30
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या प्रचाराची पातळी यंदा खूपच खालावली असून, वैयक्तिक आरोप, एकमेकांची
वॉशिंग्टन : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या प्रचाराची पातळी यंदा खूपच खालावली असून, वैयक्तिक आरोप, एकमेकांची बदनाम, आर्थिक गैरव्यवहाराचे मुद्दे आणि खासगी आयुष्यातील कुलंगडी यावरच अधिक चर्चा होताना दिसत आहे. सेंट लुईसमध्ये झालेल्या दुसऱ्या प्रेसिडेन्शिअल डिबेटमध्येही हेच विषय प्रामुख्याने चर्चिले गेले. मात्र पहिल्या डिबेटप्रमाणेच दुसऱ्या डिबेटनंतरही डेमॉक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा विजयच निश्चित असल्याचे मानले जात आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्सप यांनी बेछुट विधाने आणि अल्पसंख्य समाजाविषयीची वक्तव्ये अमेरिकन मतदारांना भावली नसल्याचे दोन्हींही चर्चांतून उघड झाले आहे.
सोमवारी झालेल्या चर्चेत डोनाल्ड ट्र्म्प यांनी कोणत्याही शरणार्थींना अमेरिकेत घुसू देणार नाही, चुंबनाविषयीचे वक्तव्ये मी खासगी गप्पांत केले होते, मी कोणत्याही महिलेचे तिच्या परवानगी चुंबन घेतलेले नाही वा तिला स्पर्श केलेला नाही. माझ्या मनात महिलांविषयी खूप आदर आहे, याउलट बिल क्लिंटन यांनी महिलांचे लैंगिन शोषण केले होते, माझ्या संपत्तीचे आॅडिट सुरू आहे, ते झाल्यावर मी टॅक्स रिटर्न्सची माहिती देईन, करचुकवेगिरीचे माझ्यावरील आरोप खोटे आहेत, रशियाबरोबर चांगले संबंध ठेवणे अमेरिकेसाठी फायद्याचे आहे, निवडणूक जिंकल्यास मी हिलरी क्लिंटन यांच्या ईमेल्सची चौकशी करून त्यांना तुरुंगात पाठवेन, इसिसला संपवून टाकेन, हिलरी यांच्या मनात माझ्याविषयी द्वेषाची भावना आहे, अशी विधाने करून श्रोत्यांची मते जिंकण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांच्या वरवरच्या, भडक आणि आक्रस्ताळ्या भाषणाने आणि वादग्रस्त ठरलेल्या खासगी आयुष्यामुळे ३४ टक्के लोकांनीच त्यांच्या बाजूने कौल दिला.
याउलट हिलरी क्लिंटन यांनी मी प्रत्येक अमेरिकन व्यक्तीबरोबर काम करेन, ज्याने मला मते दिली नाहीत, त्यांचेही प्रतिनिधीत्व करेन, ट्रम्प यांनी अमेरिकन शहिदाचा धर्माच्या नावावरून अपमान केला आहे, त्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागायला हवी, ट्रम्प यांची धोरणे अमेरिकेला आर्थिक मंदीकडे नेतील, करचुकवेगिरी करणाऱ्या ट्रम्प यांनी आतापर्यंत टॅक्स रिटर्न्सची माहिती दिलेली नाही, असे नमूद करीत आणि शांत व संयमाने बोलत चर्चेमध्ये आघाडी घेतली. त्यामुळे ५७ टक्के लोकांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी त्याच योग्य उमेदवार असल्याचे मत व्यक्त केले. याआधीच्या डिबेटमध्ये ६२ टक्के लोकांनी हिलरी क्लिंटन यांनाच कौल दिला होता. (वृत्तसंस्था)
या चर्चेदरम्यान दोघांनी एकमेकांवर विविध विषयांवरून निशाणा साधत आरोप - प्रत्यारोप केले. तसेच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यास आगामी योजनाही नमूद केले.
चर्चेची तिसरी व अंतिम फेरी १८ आॅक्टोबर रोजी होणार असून, तिसरी मतदान ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र, आपल्याच वक्तव्यांनी ट्रम्प सतत अडचणीत येत आहेत.
त्यांचे समर्थन कसे करावे, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांनाही पडला आहे. हिलरी क्लिंटन यांच्याविषयी अमेरिकन मतदारांमध्ये खूप चांगले मत नसले, तरी दोन्ही उमेदवारांमध्ये हिलरीच उत्तम आहेत, या निष्कर्षाप्रत तेथील लोक आले.