मतदारांनी 'ट्रम्प' कार्ड वापरत दिला हिलरींना धक्का

By admin | Published: November 9, 2016 01:17 PM2016-11-09T13:17:58+5:302016-11-09T14:00:33+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली आहे. वॉशिंग्टन पोस्टने डोनाल्ड ट्रम्प जिंकल्याचं वृत्त दिलं आहे.

Hillers push 'Trump' card using voters | मतदारांनी 'ट्रम्प' कार्ड वापरत दिला हिलरींना धक्का

मतदारांनी 'ट्रम्प' कार्ड वापरत दिला हिलरींना धक्का

Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 8 - डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली आहे. अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे.  सर्व अंदाज चुकवत डोनाल्ड ट्रम्प यांनी 276 मतसंघ मते मिळवून हिलरींचा दारुण पराभव केला. विजयासाठी 270 हा मॅजिक फिगर असतो. सर्वात आधी 270 मतसंघ मतं मिळवणारा उमेदवार विजेता ठरतो.  270 चा मॅजिक नंबर गाठण्यासाठी ट्रम्प आणि हिलरीमध्ये जोरदार चुरस दिसून आली.
हिलरींना फक्त 218  मतसंघ मते मिळवता आली. लोकप्रिय मतांमध्येही डोनाल्ड ट्रम्प यांनी 48 टक्के मत मिळवली तर हिलरींना 47 टक्के मते मिळाली. 
 
अमेरिकेतील 50 पैकी 48 राज्यांतील नियमांनुसार त्या राज्यात सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या पक्षालाच राज्यातील सर्व इलेक्टर्सचा पाठिंबा मिळतो. अमेरिकेतील सर्व राज्य आणि राजधानीचा डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया धरून एकूण 538 इलेक्टर्स आहेत. त्यापैकी 270 जणांचा पाठिंबा मिळवणारा उमेदवार राष्ट्राध्यक्षपदी निवडला जातो. 
 
 
अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील सर्वात वादग्रस्त व्यक्तिमत्व ठरलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी राजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय धक्का मानला जात आहे, कारण हिलरी क्लिंटन सहजरित्या निवडणूक जिंकतील असा अंदाज लावण्यात येत होता. सुरुवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेत हिलरींना पिछाडीवर टाकलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानिमित्ताने अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत राजकारणातील नवख्या व्यक्तीचे पारडे जड ठरलं आहे. 
 
डोनाल्ड ट्रम्प आत्तापर्यंतचे सर्वात वादग्रस्त उमेदवार ठरले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी यशस्वी उद्योगपती ते राजकारणी असा ट्रम्प असा प्रवास केला आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी कोणतेही राजकीय पद सांभाळलेले नाही. पदवी घेतल्यानंतर त्यांनी वडिलांच्या व्यवसायात हातभार लावण्यास सुरवात केली. नंतर ते स्वत: व्यावसायिक झाले. 
 
उमेदवारी मिळाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प आपल्या बेछूट वक्तव्यांमुळे प्रसारमाध्यमांच्या चर्चेत आले. खंतविरहित मतप्रदर्शन करणे, ही डोनल्ड ट्रम्प यांची ख्याती आहे. बेकायदा स्थलांतर, मुस्लिम दहशतवादासंदर्भातील काही विधाने वादग्रस्त ठरली आहेत. 
 
रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याआधी ट्रम्प रिअल इस्टेटच्या दुनियेतलं सर्वात मोठं नाव मानले जायचे. न्यूयॉर्कमध्ये अनेक उंच इमारती त्यांनी उभारल्या आहेत. कॉलेजच्या दिवसांमध्ये ट्रम्प विद्यार्थी नेता असल्याने नेतृत्वक्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे राजकारणाचा दांडगा अनुभव असणा-या हिलरी क्लिंटन समोर असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं आव्हान कायम ठेवलं. 
 
प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प आपल्याकडे अमेरिकेला पुढे नेण्यासाठी अनेक योजना असल्याचं जरी सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्याकडे काहीच ठोस योजना नसल्याचा दावा टीकाकारांनी केला होता. ट्रम्प यांनी अनेकदा भाषण करताना उत्साहाच्या भरात वादग्रस्त वक्तव्य केली आहेत, ज्याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता होती. तर दुसरीकडे आपल्या या मोकळ्या आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे त्यांचा चाहतावर्गही वाढलेला होता. 
 
अमेरिकेतील मुस्लिम समुदाय असो, मेक्सिकन वंशाचे नागरिक असोत किंवा स्त्रिया. या सर्वांविषयी भडकावू विधानांमुळंच ट्रम्प अलीकडे जास्त चर्चेत राहिले. अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये मोठी भिंत बांधण्याचा त्यांचा मानस आहे, जेणेकरून मेक्सिकन आणि सीरीयन शरणार्थी अमेरिकेत येणार नाहीत. पण अशा कट्टर विचारसरणीमुळं एका मोठ्या वर्गात त्यांची लोकप्रियताही वाढली.
 

 

Web Title: Hillers push 'Trump' card using voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.