पाकमध्ये रुग्णालयात हिंदू डॉक्टरचा मृतदेह
By Admin | Published: July 31, 2016 05:28 AM2016-07-31T05:28:09+5:302016-07-31T05:28:09+5:30
पाकिस्तानात सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात (आयसीयू) अनिल कुमार हे हिंदू डॉक्टर मृतावस्थेत आढळून आले.
कराची : पाकिस्तानात सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात (आयसीयू) अनिल कुमार हे हिंदू डॉक्टर मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्यामुळे चौकशी सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
कराचीत ही घटना घडली. पोलीस अधिकारी नईमुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. कुमार शस्त्रक्रिया विभागाच्या ‘आयसीयू’त मृतावस्थेत आढळून आले. ते पहाटे ५.३० वाजता आयसीयूत गेले होते. नंतर आयसीयूचा बंद दरवाजा ठोठावल्यानंतर आतून उघडला न गेल्याने तो तोडण्यात आला. आत डॉ. कुमार हे एका खुर्चीत होते. त्यांच्या शरीराची हालचाल होत नव्हती. त्यांच्याजवळ एक इंजेक्शन सापडले. हेच इंजेक्शन त्यांच्या हातावर टोचल्याचे दिसत आहे.
त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात येत आहे, असेही नईमुद्दीन यांनी सांगितले. कुमार यांचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात पाठविण्यात आला. तेथे डॉक्टरांनी उत्तरीय तपासणी केली. तथापि, मृत्यूचे कारण रासायनिक अहवाल येईपर्यंत राखून ठेवण्यात आले आहे. कुमार यांच्याजवळ आढळलेले इंजेक्शन तपासणीसाठी सहायक न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)