पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण करुन जबरदस्तीने धर्मांतर; मुस्लीम युवकाशी लावला निकाह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 12:16 PM2020-01-28T12:16:59+5:302020-01-28T12:20:20+5:30
वृत्तानुसार, मुलीला लग्नाच्या मंडपातून पळवून नेले आणि नंतर जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारुन तिचे लग्न केले.
इस्लामाबाद - काही दिवसांपूर्वीच भारताने शेजारील राष्ट्रातून आलेल्या शरणार्थी अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व देण्याचा कायदा पारित केला. मुस्लीम बहुल राष्ट्रात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाने केला मात्र सरकारने आणलेल्या या कायद्यामुळे देशाचं धर्माच्या नावावर विभाजन होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. याच दरम्यान पाकिस्तानच्या सिंधमध्ये हिंदू वधूचं अपहरण प्रकरणात आता एक नवीन बाब समोर आली आहे.
वृत्तानुसार, मुलीला लग्नाच्या मंडपातून पळवून नेले आणि नंतर जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारुन तिचे लग्न केले. इम्रान खान एकीकडे नवीन पाकिस्तान बनवण्याचा दावा करत असताना त्यांच्या कार्यकाळात हिंदू महिलांचे अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतर घडवण्याच्या घटना थांबत नसल्याचं यातून पुन्हा एकदा उघड झालं. कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आहे. पूर्वी या घटनेला प्रेम प्रकरणांशी जोडलं जात होतं. माहितीनुसार पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मटियारी जिल्ह्यातील हाला शहरात भारतीबाई नावाच्या हिंदू मुलीचा विवाह सोहळा सुरु होता. त्याचवेळी काही लोकांनी तिच्या घरातून मुलीचं अपहरण केले. अखिल पाकिस्तान हिंदू पंचायतचे सरचिटणीस रवी धवानी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार दोन आठवड्यांत हिंदू महिलांना लक्ष्य केले जाण्याची ही तिसरी घटना आहे. या महिन्याच्या 15 तारखेला एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलास जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं.
धर्म परिवर्तन करुन जबरदस्तीने केला निकाह
धवानी म्हणाले की, भारतीबाईंचे अपहरण करून त्यांना सिंधच्या हाला शहरातून कराचीच्या बनोरिया येथे नेण्यात आले. जिथे तिचे जबरदस्तीने धर्मांतर केले गेले. यानंतर शाहरुख मेनन नावाच्या मुस्लिम युवकाशी तिचं लग्न लावण्यात आले. मुलीच्या कुटुंबीयांना पंचायतीच्या मदतीने पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात आले. पोलिसांनी मुलीला कराचीहून परत सिंध येथे आणले आणि तिला न्यायालयात हजर केले.
अपहरणकर्त्यावर कारवाई केल्याची माहिती दिली नाही.
युवतीचं अपहरण करणाऱ्या मुलावर काय कारवाई झाली याची माहिती पोलिसांनी अद्याप दिलेली नाही. मीरपूर खासमध्ये चार दिवसांपूर्वी एका 25 वर्षीय हिंदू महिलेचे अपहरण करून धर्मांतर केले गेले असं धवानी यांनी सांगितले.