‘हिंदू विवाह’ पाकमध्ये मंजूर
By admin | Published: February 19, 2017 02:15 AM2017-02-19T02:15:54+5:302017-02-19T02:15:54+5:30
अल्पसंख्याक हिंदूंच्या विवाहाच्या नियमनाशी संबंधित महत्त्वपूर्ण विधेयक पाकिस्तानच्या सिनेटने शनिवारी मतैक्याने संमत केले. यामुळे पाकमधील हिंदूंना मोठा दिलासा
इस्लामाबाद : अल्पसंख्याक हिंदूंच्या विवाहाच्या नियमनाशी संबंधित महत्त्वपूर्ण विधेयक पाकिस्तानच्या सिनेटने शनिवारी मतैक्याने संमत केले. यामुळे पाकमधील हिंदूंना मोठा दिलासा मिळाला आहे. हिंदू विवाह विधेयक २०१७ शुक्रवारी सिनेटमध्ये संमत करण्यात आले. आता राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.
हा हिंदू समुदायाचा पहिला तपशीलवार वैयक्तिक कायदा आहे. पाकच्या कनिष्ठ सभागृहात (नॅशनल असेम्ब्ली) हे विधेयक १५ सप्टेंबर २०१५ रोजीच संमत झाले असून, कायद्याचे रूप धारण करण्यासाठी केवळ राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा आहे. हे विधेयक विवाह, विवाहाची नोंदणी, घटस्फोट आणि पुनर्विवाहाशी संबंधित असल्यामुळे पाकमधील हिंदूंना हे स्वीकारार्ह आहे, असे ‘डॉन’च्या वृत्तात म्हटले आहे. या विधेयकात मुलगा आणि मुलीच्या विवाहासाठी किमान वय १८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या कायद्यामुळे हिंदू महिला आता आपल्या विवाहाचा कागदोपत्री पुरावा प्राप्त करू शकतील. पाकिस्तानी हिंदूंसाठी हा पहिला वैयक्तिक कायदा असेल जो पंजाब, बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात लागू होईल. सिंध प्रांताने आधीच आपले हिंदू विवाह विधेयक तयार केले आहे. हे विधेयक विधिमंत्री जाहीद हमीद यांनी सिनेटमध्ये मांडले. त्याला कोणीही विरोध केला नाही. सिनेट फंक्शनल कमिटी आॅन ह्युमन राईटस्ने २ जानेवारी रोजी मोठ्या बहुमताने हे विधेयक संमत केले होते. तथापि, जमियत उलेमा- ए- इस्लाम- फजलचे सिनेटर मुफ्ती अब्दुल सत्तार यांनी अशा गरजा पूर्ण करण्यासाठी घटना पुरेशी आहे, असे सांगून या विधेयकाला विरोध केला. (वृत्तसंस्था)
हा कायदा बळजबरीचे धर्मांतर हाणून पाडेल
विधेयक संमत करताना समितीच्या अध्यक्ष आणि मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटच्या सिनेट सदस्य नसरीन जलील म्हणाल्या की, पाकच्या हिंदूंसाठी वैयक्तिक कायदा तयार करू शकलो नाही, हे अयोग्य आहे. हे केवळ इस्लामच्या सिद्धांतांविरुद्धच नाही, तर मानवाधिकारांचेही उल्लंघन आहे.
सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे हिंदू खासदार रमेश कुमार वंकवानी देशात हिंदू विवाह कायदा आणण्यासाठी तीन वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. खासदारांचे आभार मानताना हा कायदा बळजबरीचे धर्मांतर हाणून पाडेल. आपण विवाहित आहोत हे सिद्ध करणे हिंदू विवाहितेला कठीण असते. ही बाब बळजबरीने धर्मांतरण करणाऱ्यांच्या पथ्यावर पडत होती, असे ते म्हणाले.