कॅनडात पुन्हा एकदा हिंदूंच्या मंदिरात तोडफोड, भिंतींवर लिहिल्या भारत विरोधी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 01:13 PM2023-04-06T13:13:38+5:302023-04-06T13:15:33+5:30
Hindu Temple Vandalised In Canada: विंडसर पोलिसांनी ही 'द्वेषपूर्ण घटना' असल्याचे म्हणत तपास सुरू केला आहे. ते दोन संशयितांचा शोध घेत आहेत.
कॅनडामध्ये पुन्हा एकदा हिंदूंच्यामंदिरात तोडफोड केल्याची घटना घडली असून मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. यावेळी ओंटारियोतील विंडसरमध्ये असलेल्या एका हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. विंडसर पोलिसांनी ही 'द्वेषपूर्ण घटना' असल्याचे म्हणत तपास सुरू केला आहे. ते दोन संशयितांचा शोध घेत आहेत.
विंडसर पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘5 एप्रिल, 2023 रोजी या संबंधित तोडफोडीच्या रिपोर्टनंतर, अधिकाऱ्यांना नॉर्थवे एव्हेन्यूच्या 1700 ब्लॉकमधील हिंदू मंदिरात पाठवण्यात आले होते. यावेळी अधिकाऱ्यांना मंदिराच्या बाहेरील भिंदीवर काळ्या रंगात हिंदू आणि भारत-विरोधी भित्तिचित्रे आढळून आली.’
तपासात मिळाला व्हिडिओ -
तपासात पोलिस अधिकाऱ्यांना एक व्हिडिओ मिळाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन संशयित रात्री 12 वाजल्यानंतर (स्थानिक वेळेनुसार) दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'व्हिडिओमध्ये एक संशयित इमारतीच्या भिंतीची तोडफोड करताना दिसत आहे, तर दुसरा पाळत ठेवत आहे.'
यापूर्वीही हिंदू मंदिरांना करण्यात आले आहे लक्ष -
कॅनडामध्ये हिंदू मंदिराची तोडफोड होण्याची आणि त्याच्या भिंतींवर भारतविरोधी अथवा हिंदू विरोधी घोषणा लिहिण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वीही फेब्रुवारी महिन्यात कॅनडातील मिसिसॉगा येथील राम मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. तसेच भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने घडलेल्या घटनेचा निषेध केला असून कॅनडाच्या अधिकाऱ्यांना संबंधित घटनेची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे.
यापूर्वी जानेवारी महिन्यातही ब्रँम्पटनमध्ये एका हिंदू मंदिरावर भारत विरोधी भित्तिचित्रे लावण्यात आली होती. यामुळे येथील भारतीय समाजात नाराजी निर्माण झाली होती. यावेळी ब्रँम्पटनचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनीही मंदिरातील तोडफोडीचा निषेध केला होता.