अबुधाबीनंतर आता 'या' मुस्लिम देशात बांधणार हिंदू मंदिर, लवकरच काम सुरू होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 01:15 PM2024-02-15T13:15:40+5:302024-02-15T13:19:01+5:30
अबुधाबीनंतर आता आणखी एका मुस्लिम देशात हिंदू मंदिर बांधले जाणार आहे.
Abu dhabi and Bahrain (Marathi News): अबुधाबीमध्ये बांधलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. अबुधाबीमधील हे मंदिर अतिशय भव्य आणि विशाल आहे. याठिकाणी सनातनी संस्कृती पाहायला मिळते. बीएपीएसने बांधलेल्या या मंदिराचे उद्घाटन काल म्हणजेच १४ फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.अशाप्रकारे युएई या मुस्लिम देशातही पहिले मंदिर अबुधाबीमध्ये पूर्ण झाले.
अबुधाबीनंतर आता आणखी एका मुस्लिम देशात हिंदू मंदिर बांधले जाणार आहे. त्यासाठी या देशाच्या किंगकडून जमीन घेण्यात आली आहे. या मंदिराचे लवकरच काम सुरू होणार आहे. यूएईनंतर आता मुस्लिम देश बहरीनमध्ये मंदिर बांधले जाणार आहे. हे मंदिरही अबुधाबीमधील मंदिराप्रमाणेच विशाल असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे मंदिर बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था म्हणजेच बीएपीएस बांधणार आहे.
मंदिराच्या बांधकामाबाबत बीएपीएस शिष्टमंडळाने बहरीनच्या किंगसोबत चर्चा केली. मंदिरासाठीची जमीन बहरीन सरकारने आधीच दिली आहे आणि आता बांधकाम सुरू करण्याची औपचारिकताही पूर्ण झाली आहे. दरम्यान, 1 फेब्रुवारी 2022 रोजी बहरीनचे क्राउन प्रिन्स सलमान बिन हमाद अल खलिफा यांनी स्वामीनारायण हिंदू मंदिर बांधण्यासाठी जमीन देण्याची घोषणा केली होती. यानंतर स्वामी अक्षरातीतदास, डॉ. प्रफुल्ल वैद्य, रमेश पाटीदार आणि महेश देवजी यांच्या शिष्टमंडळाने मंदिराच्या बांधकामासंदर्भात त्यांची भेट घेतली.
मंदिराचा उद्देश सर्व धर्मातील लोकांचे स्वागत करणे, विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रमांसाठी जागा उपलब्ध करून देणे आहे, असे बीएपीएसने सांगितले आहे. तसेच, बीएपीएसचे गुरू महंत स्वामी महाराज यांनी बहरीनमधील मंदिरासाठी जमिनी मिळाल्याबद्द्ल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बहरीनचे क्राउन प्रिन्स यांचे आभार मानले आहेत. यातून दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंध आणि धार्मिक सौहार्दाचा चिरंतन विश्वास दिसून येतो, असेही ते म्हणाले.