बांगलादेशात हिंदू मंदिरांवर पुन्हा हल्ला; दिवाळी, काली पूजेपूर्वीच धार्मिक तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 11:24 PM2021-11-03T23:24:01+5:302021-11-03T23:25:07+5:30
ढाका - बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले सुरूच आहेत. सोमवारी रात्री उशिरा नौगाव जिल्ह्यातील दोन गावांतील वेगवेगळ्या मंदिरांवर धर्मांध हल्लेखोरांनी ...
ढाका - बांगलादेशातहिंदू मंदिरांवर हल्ले सुरूच आहेत. सोमवारी रात्री उशिरा नौगाव जिल्ह्यातील दोन गावांतील वेगवेगळ्या मंदिरांवर धर्मांध हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी मंदिरात ठेवलेल्या देवतांच्या मूर्तींची मोडतोड केली. दिवाळी आणि काली पूजेपूर्वीच पुन्हा सुरू झालेल्या या हल्ल्यांमुळे बांगलादेशातील धार्मिक तणाव आणखी वाढला आहे. याआधी नवरात्रीच्या काळात बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये दुर्गा पेडॉल आणि मंदिरांवर हल्ले झाले होते.
प्रशासकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर -
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, हल्ल्याची माहिती मिळल्यानंतर, पोरशा उपजिल्ह्याचे अधिकारी मोहम्मद नजमुल हमीद रझा मंगळवारी घटनास्थळी पोहोचले. तसेच घटनेत सहभागी असलेल्यांचा शोध सुरू आल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. या परिसरात हिंदू मंदिरात घुसून देवतांच्या मूर्तींची तोडफोड केल्याची घटना यापूर्वी कधीही घडली नसल्याचा दावाही त्यांनी केला.
इस्कॉन मंदिरावरही झाला होता हल्ला -
गेल्या 15 ऑक्टोबरला नोआखली भागात धर्मांधांनी इस्कॉन मंदिरातही तोडफोड केली होती. यादरम्यान हल्लेखोरांनी मंदिरात उपस्थित भाविकांनाही मारहाण केली होती. इस्कॉन मंदिराने ट्विट केले होते, की या हल्ल्यात अनेक भाविक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धर्मांधांच्या जमावाने मंदिर परिसरात जाळपोळही केली होती.
दुर्गा पूजा मंडपांवरही हल्ले -
बांगलादेशात नवरात्रीच्या काळात अनेक दुर्गा पूजा मंडपांवरही हल्ले झाले आणि तोडफोड करण्यात आली. कोमिला शहरातील नानुआर दिघी तलावाजवळील दुर्गा पूजा मंडपात कुराणाची कथित विटंबना झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरवली गेली. यानंतर धर्मांधांच्या जमावाने चंदपूरमधील हाजीगंज, चट्टोग्राममधील बांशखली आणि कॉक्स बाजारमधील पेकुआ येथे हिंदू मंदिरे आणि मंडपांवर हल्ले केले होते.