हिंदू धर्मामुळे भारतात कट्टर इस्लाम फोफावला नाही, चिनी मीडियाकडून हिंदू धर्माचं कौतुक
By शिवराज यादव | Published: August 31, 2017 02:33 PM2017-08-31T14:33:58+5:302017-08-31T15:02:54+5:30
डोकलाम वादाला पुर्णविराम मिळाल्यानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-याआधी चीनी मीडियाने मवाळ भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली, दि. - डोकलाम वादाला पुर्णविराम मिळाल्यानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-याआधी चिनी मीडियाने मवाळ भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समकडून भारत आणि हिंदू धर्माचं तोंडभरुन कौतुक करण्यात आलं आहे. हिंदू धर्मामुळेच भारतात कट्टर इस्लामचा प्रसार होऊ शकला नाही अशी स्तुतीसुमनं ग्लोबल टाईम्सने उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला जाणार आहेत.
ग्लोबल टाईम्समध्ये छापण्यात आलेल्या या लेखात सांगण्यात आलं आहे की, 'भारतातील हिंदू धर्मामुळे कट्टर इस्लाम आपली जागा निर्माण करु शकला नाही'. या लेखात भारतामधील हिंदू धर्माचं कौतुक करत असताना कशाप्रकारे फक्त धर्म म्हणून आपली ओळख न ठेवता हिंदू धर्माने एक जीवनशैली आणि सामाजिक व्यवस्थेचं रुप घेतलं हेदेखील सांगण्यात आलं आहे.
या लेखाची सुरुवात 1995 रोजी रिलीज झालेल्या 'बॉम्बे' चित्रपटाच्या उल्लेखाने होते. हा चित्रपट एक मुस्लिम तरुणी आणि हिंदू तरुणावर आधारित असून, कशाप्रकारे ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि नंतर कुटंब, धर्माची बंधनं जुगारत विवाहबंधनात अडकतात हे दाखवण्यात आलं आहे. यानंतर दोघेही जातीय दंगलीत अडकतात, आणि त्यानंतर होणा-या घटना या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. हा चित्रपट 1992 च्या दंगलीवर आधारित होता. ग्लोबल टाईम्सने चित्रपटाचं उदाहरण देत, भारतात कट्टर इस्लाम आपली जागा निर्माण का करु शकला नाही याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं सांगितलं आहे.
आशियामधील दुस-या देशांमध्ये असणा-या इस्लामिक संघटनांची संख्या पाहता भारतामध्ये अशा संघटनांची उपस्थिती जवळपास नाहीच आहे असंही लेखातून सांगण्यात आलं आहे. यावेळी फिलीपाईन्सचं उदाहरण देत, कट्टरतावाद्यांनी संपुर्ण देशाचं नुकसान केलं असल्याचं लिहिलं आहे.
चिनी वृत्तपत्राने भारताचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 'भारतात इस्लामिक अतिरेक्यांचं अस्तिव नसल्यासारखंच आहे. आशियातील इतर देशांशी तुलना करता हीच गोष्ट भारताला उजवा ठरवते. संपुर्ण जग यासाठी भारताचं कौतूक करतं. जेव्हा कधी आशियाशी संबंधित धोरणांवर चर्चा केली जाते तेव्हा अमेरिका, रशिया, जपान आणि युरोपीय देश याच गोष्टीवरुन भारताचं महत्व लक्षात घेतात', असं लेखात सांगितलं आहे.