पाकिस्तानात हिंदूंवर धर्मांतराची बळजबरी; छळवणुकीविरोधात रस्त्यावर उतरल्या महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 04:23 PM2020-05-18T16:23:15+5:302020-05-18T16:27:22+5:30
तबलिगी जमातच्या लोकांकडून छळ केला जात असल्याचा आरोप होत आहे. सिंध प्रांतातील तबलिगी जमातच्या लोकांनी हिंदूंवर अत्याचार चालवण्याचा तिथल्या लोकांचा आरोप आहे.
इस्लामाबादः पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून हिंदूंचा छळ केला जात असल्याचा घटना समोर आल्या आहेत. त्या भागात हिंदू महिलांचा छळ करत असल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक हिंदू महिला ओरडून सांगत आहे की, "आम्ही मरणं पसंत करू, पण कधीही इस्लाम धर्म स्वीकारणार नाही. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात सर्वाधिक हिंदूंची संख्या आहे. पाकिस्तानमध्ये ७५ लाख हिंदू असल्याचीही माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे या हिंदूंचा तबलिगी जमातच्या लोकांकडून छळ केला जात असल्याचा आरोप होत आहे. सिंध प्रांतातील तबलिगी जमातच्या लोकांनी हिंदूंवर अत्याचार चालवण्याचा तिथल्या लोकांचा आरोप आहे.
भिल्ल समुदायाच्या या हिंदू लोकांना जबरदस्तीनं इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडलं जात आहे. त्या धर्मांतराला विरोध करण्यासाठीच तिथल्या महिलाही रस्त्यावर उतरल्या आहेत. महिलांबरोबर लहान मुलंही पोस्टर झळकावून धर्मांतराला विरोध करत असल्याचं चित्र सध्या तिकडे पाहायला मिळत आहे. इस्लामिक कट्टरपंथीयांकडून तिथल्या हिंदूंवर अत्याचार केले जात असल्याचीही प्रकरणं समोर आली आहेत. विशेष म्हणजे तबलिगी जमातचे लोक त्यांना धर्मांतर करण्यासाठी बळजबरी करत असल्याचाही तिथल्या हिंदूंचा आरोप आहे.
एका महिलेनं व्हिडीओत सांगितलं की, माझ्या मुलाचं तबलिगी जमातच्या लोकांकडून अपहरण करण्यात आलं आहे. माझ्या मुलाला सोडा, अशी विनवणीही ही महिला व्हिडीओतून करत असल्याचं समोर आलं आहे. त्यानतंर पाकिस्तान हिंदू परिषदेचे प्रमुख आणि तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे खासदार डॉ. रमेश वंकवाणी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
वंकवाणी म्हणाले की, पाकिस्तान सरकारच्या अल्पसंख्याक परिषदेने या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले पाहिजेत, कारण हिंदू समाज सिंधमध्ये सक्तीने धर्मांतर करण्याविरोधात दीर्घ काळापासून निषेध नोंदवत आहे. सिंध प्रांतातील हिंदूंचा असा आरोप आहे की, तबलिगी जमात गटाच्या लोकांनी धर्म परिवर्तनास नकार दिल्यामुळे सिंध प्रांताच्या मटियार परिसरातील नसूरपूर गावातील घरांचे नुकसान केले आणि त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत.
छळ होत असलेल्या महिलेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत मूळचे पाकिस्तानी असलेले मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी निषेध नोंदवला आहे. जिहादच्या नावाखाली अनेकांना दहशतवादाकडे वळवले जात आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू आणि ख्रिस्ती लोकांचे धर्मांतर करणे हे त्यांचे लक्ष्य आहे, यासाठी ते प्रत्येक वाईट गोष्टी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोरोनापाठोपाठ भारतात लवकरच धडकणार दुसरं मोठं संकट; मोदींनी बोलावली तात्काळ बैठक
CoronaVirus: ...तरीही चीननं आपल्या लोकांना देशाबाहेर पाठवलं; अमेरिकेचा चीनवर 'गंभीर' आरोप
CoronaVirus: चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार; इम्युनिटी कमी असलेल्या वयोवृद्धांचा धोका वाढणार
Coronavirus: चीनविरोधात जगातील ६२ देशांनी आखला ‘चक्रव्यूह’; कोरोनाला जबाबदार आढळल्यास...
Lockdown 4.0: जाणून घ्या, तुमच्या विभागात दुचाकी, ऑटो, बस, टॅक्सी सेवा सुरु होणार? वाचा नियम!
इस्राइलमधील राजकीय अनिश्चितता संपुष्टात, नेतान्याहू पुन्हा पंतप्रधानपदी, मोदींनी दिल्या शुभेच्छा