Hiroshima Nagasaki Bombing : लिटल बॉयचा धमाका आणि एका क्षणात झालं सगळं बेचिराख
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 14:05 IST2018-08-06T13:33:41+5:302018-08-06T14:05:21+5:30
Hiroshima Nagasaki Bombing: दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस शरणागती पत्करण्यास तयार नसलेल्या जपानला अद्दल घडवण्यासाठी अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर केला होता

Hiroshima Nagasaki Bombing : लिटल बॉयचा धमाका आणि एका क्षणात झालं सगळं बेचिराख
1939 ते 1945 दरम्यान, झालेले दुसरे महायुद्ध हे मानवी इतिहासातील सर्वात क्रूर युद्ध म्हणून ओळखले जाते. या युद्धादरम्यान विविध देशांचे कोट्यवधी सैनिक आणि तेवढेच नागरिक मारले गेले होते. या युद्धाच्या अखेरीस शरणागती पत्करण्यास तयार नसलेल्या जपानला अद्दल घडवण्यासाठी अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर केला होता. जपानमधील हिरोशिमा आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. या हल्ल्यांमध्ये सुमारे दीड ते दोन लाख जपानी नागरिक मारले गेले होते.
1945 च्या मध्यावर युद्ध निर्णायक स्थितीत आले असतानाही. अमेरिका, इंग्लंड, चीन या मित्र राष्ट्रांच्या सैन्याला अक्ष राष्ट्रांमधील जपानकडून कडवी झुंज मिळत होती. हिटलरचा जर्मनी आणि मुसोलिनीच्या इटलीने शरणागती पत्करल्यानंतरही जपान शस्त्र खाली ठेवण्यास तयार नव्हता. सहा वर्षे चाललेले युद्ध लांबत असल्याने मित्र राष्ट्रांच्या सैनिकांचीही दमछाक होत होती. अशा परिस्थितीत अमेरिकेने जपानवर एका नव्या आणि तितक्याच संहारक अस्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला. हे संहारक अस्र होते अणुबॉम्ब.
क्षणात महाविद्ध्वंस घडवणारा अणुबॉम्ब टाकण्यासाठी ठिकाण निश्चित करण्या आल्यानंतर अमेरिकन जवानांनी हा नव्या प्रकारचा बॉम्ब टाकायचा याचा सराव केला. त्यानंतर 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमावर बॉम्ब टाकण्याचे निश्चित करण्यात आले. त्याआधी असा बॉम्ब टाकणार असल्याची पत्रके हिरोशिमा शहरात टाकली होती. 6 ऑगस्टच्या सकाळी अमेरिकन हवाई दलाचे इनोला गे हे विमान अणुबॉम्ब घेऊन निघाले. त्यावेळी हिरोशिमामधील नागरिकांना आपल्यासमोर कोणते संकट येतेय याची काहीच कल्पना नव्हती. हिरोशिमामधील स्थानिक वेळेनुसार सकाळी सव्वा आठ वाजता लिटल बॉय नावाचा सुमारे 4400 किलो वजनाचा अणुबॉम्ब शहरावर टाकण्यात आला. तेथील रहिवाशांनी एक विचित्र आकाराचा सूर्य चमकताना पाहिले. अन् क्षणात त्याचा स्फोट होऊन प्रचंड उष्णता आणि वादळ निर्माण झाले. हा बॉम्ब जिथे पडला तिथल्या हजारो लोकांची राखही शिल्लक राहिली नाही. तर उर्वरित शहरात लाखभर लोक मारले गेले. जे जखमी झाले त्यांची अवस्था वेदनादायी जखमांमुळे मेल्याहून मेल्यासारखी झाली.
त्यानंतर तीन दिवसांनी नागासाकी या जपानमधील औद्योगिक शहराला अमेरिकेने लक्ष्य केले. या शहरावर लिटल बॉयपेक्षा मोठा बॉम्ब टाकण्यात आला. मात्र नागासाकी हे शहर डोंगरांनी वेढलेले असल्याने मर्यादित परिसरात प्रचंड हानी झाली. येथेही सुमारे 60 ते 80 हजार लोक मारले गेले. दोन्ही शहरे बेचिराख झाली. या दोन्ही हल्ल्यात वापरण्यात आलेल्या बॉम्बची नावे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांच्या नावावरून लिटल बॉय आणि इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्यावरून फॅट मॅन असे करण्यात आले होते. या हल्ल्यामुळे मनोबल खचलेल्या जपानने अखेर 15 ऑगस्ट 1945 रोजी शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली.