Hiroshima Nagasaki Bombing: विध्वंस जन्माला घालणारं गाव!
By पवन देशपांडे | Published: August 6, 2018 04:39 PM2018-08-06T16:39:33+5:302018-08-06T16:40:24+5:30
एका वळणावर अचानक एक चेकपोस्ट लागलं. तिथं लिहिलं होतं, ‘‘परवानगीशिवाय आणि ओळखपत्राशिवाय गावात प्रवेश निशिद्ध.’’ हा बोर्ड पाहिला आणि या गावात असं काय, असा आम्हा सा-यांनाच प्रश्न पडला. तिथून त्या गावाची ओळख सुरू झाली. ते गाव होतं लॉस अलामोस.
शेकडो संशोधक गायब झाले. रोज चालत-बोलत वेगवेगळ्या संशोधन कार्यशाळांमध्ये शोध लावण्याची धडपड करणारे तरुणांची ही फळी दिसेनाशी झाली. अक्षरश: गुडुप झाली. ही फळी कुठे होती जगाला माहीत नव्हतं. काय करत होती, तेही ठाऊक नव्हतं. येत्या काही महिन्यांत हे संशोधक काय जन्माला घालणार आहेत, याची कोणालाही पुसटशी कल्पना नव्हती... त्यांनी भलामोठा विध्वंस प्रसवला आणि जगाला त्यांची, त्यांच्या देशाची ताकद कळली... नेमके कुठे होते हे संशोधक ?
चोहिबाजूंनी डोंगररांगा. त्यावर उंचउंच झेपावणारी पाइनची झाडं. झाडांच्या खाली काही म्हातारे होऊन काही अवेळी पडलेले पाइन कोन. वळणावळणा रस्ता. कुठे आडवणावरून छोटीशी नदी वाहताना दिसायची. मध्ये ती नदी एखाद्या मोठ्ठ्या खडकाने अडवलेली असायची. त्यावर पहुडणारे पर्यटक. भलामोठा हायवे आणि त्यावरून १२० किमीच्या वेगाने धावणारी आमची कार. आम्ही एका विध्वंस प्रसुतीच्या ‘शोधशहरा’पासून जाणार होतो, अशी पुरसटशी कल्पनाही नव्हती. अमेरिका सरकारने आयोजित केलेल्या अभ्यासदौ-यादरम्यान आम्ही सँटा फे नावाच्या कलेच्या माहेरघराकडे निघालेलो होतो. भर उन्हात थंड हवेची लाट कायम होती. आमच्यासोबत डोना नावाची मध्यम वयाची एक गाइडही होती. बोलकी आणि त्या परिसराचा संपूर्ण इतिहास तोंड पाठ असलेली बाई मधूनमधून त्या परिसरात घडलेली विनोदही ऐकवायची. एका वळणावर अचानक एक चेकपोस्ट लागलं. तिथं लिहिलं होतं, ‘‘परवानगीशिवाय आणि ओळखपत्राशिवाय गावात प्रवेश निशिद्ध.’’ हा बोर्ड पाहिला आणि या गावात असं काय, असा आम्हा सा-यांनाच प्रश्न पडला. तिथून त्या गावाची ओळख सुरू झाली. ते गाव होतं लॉस अलामोस.
नावात तसं काहीच नाही. इतर कोणत्याही गावासारखं गाव. पण तिथे प्रवेश निशिद्ध करण्याचं वेगळं कारण होतं. डोना नावाच्या आमच्या गाइड बाईनं जी माहिती सांगितली ती थक्क करणारी होती. कारण हे होतं विध्वंसाला जन्म घालणारं गाव. दुस-या महायुद्धात अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकी या जपानमधील शहरांवर जे अणुबॉम्ब टाकले ते अणुबॉम्ब प्रसवणारं हे गाव.
१९४२ पर्यंत हे गाव तसं फार नावाजलेलं नव्हतं. कधीकाळी ज्वालामुखीच्या अनेक उद्रेकांतून तयार झालेल्या हेमस पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं हे गाव. या गावात काही आदिवासी जमाती, काही स्थानिक अमेरिकन लोकं, काही स्पॅनिश लोकं गुण्यागोविंदानं नांदत होती. इथल्या एका जमीनदाराने त्याच्या जमिनीपैकी भलीमोठी जमीन डेट्रॉइटचे श्रीमंत व्यावसायिक अॅश्ले पाँड (द्वितीय) यांना विकली. त्यांनी नंतर त्या जागेवर एक शाळा उभारली. अमेरिकेतील श्रीमंतांच्या मुलांसाठी उभारलेल्या या शाळेचं नाव होतं लॉस अलामोस रांच स्कूल. भल्यामोठ्या शाळेत १२ ते १६ वर्षांची केवळ ४६ विद्यार्थी शिकायची. तब्बल २५ वर्ष प्रत्येक वर्षीच्या बॅचमध्ये एवढेच विद्यार्थी घेऊन ही रांच शाळा सुरू होती. पण १३ आॅगस्ट १९४२ नंतर इथलं चित्र पालटलं.
या गावावर अमेरिकन सरकारची नजर पडली. या गावात शिरायला मोजके दोन रस्ते. एका बाजूने शिरणारा एक आणि दुसºया बाजूने निघणारा एक. मोठी जागा, चांगल्या वापरासाठी शाळेच्या इमारती इथं उभ्या होत्या. शिवाय पर्वतरांगांच्या कुशीत असल्यानं आणि शेकडो मैलापर्यंत सुमुद्रकिनारा नसल्यानं हे गाव एका सिक्रेट मिशनसाठी निवडलं गेलं. ते मिशन होतं अणुबॉम्ब तयार करण्याचं. अमेरिकन लष्कराच्या मॅनहॅटन इंजिनीअरिंग डिस्ट्रिक्टने हे अख्ख गाव विकत घेतलं. ताब्यात घेतलं आणि गावाचं चित्र पालटलं. जागोजागी अमेरिकन सैन्य दिसायला लागलं. वेगवेगळं साहित्य घेऊन येणारे शेकडो ट्रक दिसू लागले. नव्या इमारतींच बांधकाम सुरू झालं. या ट्रकमध्ये काय आहे, हे कोणालाच कळू नये म्हणून त्यावर साध्यासाध्या साहित्यांचे लेबल लावले गेले होते.
काही दिवसांत शेकडो तरुण संशोधक आपल्या नातेवाईकांना, मित्रांना कुठे जातोय हे न कळवता कुटुंबासह राहायला आले. गावात कोण येणार आणि कोण इथून जाणार यासाठी परवानगी लागू लागली. विशेष म्हणजे या गावाचं नावही बदलण्यात आलं. सुरुवातीला लोकांसाठी या गावाचं नाव ठेवलं गेलं ‘द हिल’. त्यानंतर लष्करासाठी हे गाव होतं ‘साईट वाय’ आणि अखेर कोणालाही कळू नये म्हणून याला थेट ‘पोस्ट बॉक्स नंबर १६६३’ असं नाव दिलं गेलं.
या गावाचा पत्ता होता... ‘पोस्ट बॉक्स नंबर १६६३, सँटा फे, एनएम.’ कारण हे सिक्रेट मिशन होतं. अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडनं मिळून हाती घेतलेलं अणुबॉम्ब तयार करण्याचं मिशन. त्याला अमेरिकेनं ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’ असं नाव दिलं. लाखभर संशोधकांना हातीशी धरून अमेरिकेनं दोन अणुबॉम्ब तयार केलं. छोट्या बॉम्बचं नाव होतं ‘लिटिल बॉय’ अन् मोठ्या बॉम्बचं नाव होतं ‘फॅट मॅन’.
‘लिटिल बॉय’ तयार झाल्यानंतर ६ आॅगस्ट १९४५ च्या सकाळी सव्वा आठच्या सुमारास हिरोशिमावर टाकला गेला. त्यानंतर तीनच दिवसांनी ९ आॅगस्ट १९४५ च्या भल्या पहाटे ३ वाजून ४६ मिनिटांनी नागासाकी शहरावर अमेरिकेनं ‘फॅट मॅन’ नावाचा अणुबॉम्ब टाकला. या दोन्ही महाभयंकर स्फोटांनी जपानमध्ये विध्वंस घडविला. तब्बल ३ लाखांहून अधिक बळी घेतले. त्यानंतर हे दोन्ही विध्वंसक बॉम्ब तयार करणारं गाव मात्र जल्लोषानं नाचत होतं. त्यांच्या प्रयोगानं लाखोंचा जीव घेतला याची सल नंतर मात्र काहिंनी बोलून दाखवली काहिंनी तशीच मनात दडवून ठेवत अमेरिकेत संशोधन सुरू ठेवलं. काही शांततेच्या मार्गावर आले.
भारत स्वातंत्र्य झाला त्या १५ आॅगस्ट १९४७ च्या दिवशीच लास अॅलोमास या गावानं स्वातंत्र्याचा श्वास घेतला. कारण अमेरिकन सरकारचं अणुबॉम्ब बनविण्याचं मिशन पूर्ण झालेलं होतं आणि त्यांनी हा प्रोजेक्ट संपल्याचं जाहीर केलं होतं. ते लास अॅलामोस गाव आजही शोधांची जननी म्हणून काम करतंय. गावानं तुम्हा-आम्हाला दाखवण्यासाठी आतापर्यंत सारे विध्वंसक प्रसुतीक्षण जपले आहेत... हे सारं सांगत असताना आमची गाईड डोना, अमेरिकेनं केलेल्या या विध्वंसाचं ओझं घेऊन बोलत असल्याचं जाणवत होतं.