राष्ट्राध्यक्ष म्हणून शेवटचे भाषण करताना ओबामांच्या डोळयात तरळले अश्रू
By admin | Published: January 11, 2017 08:33 AM2017-01-11T08:33:52+5:302017-01-11T09:22:11+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आज राष्ट्राध्यक्ष म्हणून शेवटचे भाषण सुरु आहे. त्यांनी आपल्या भाषणात दहशतवाद ते अमेरिकन लोकशाहीपर्यंत सर्व विषयांना स्पर्श केला.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 11 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शिकागो शहरात आज अध्यक्षीयपदाचे शेवटचे भाषण दिले. आपल्या भाषणात त्यांनी आठवर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेताना अमेरिकन लोकशाहीपासून ते दहशतवाद अशा सर्व मुद्यांना स्पर्श केला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व अमेरिकन नागरीकांच्या मनाला स्पर्श होईल असे भाषण करण्याचा ओबामांनी प्रयत्न केला.
भाषण करताना भावूक झालेल्या ओबामांच्या डोळयात अश्रू तरळले. त्यांनी पत्नी मिशेल ओबामांचेही आभार मानले. यावेळी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा, उपाध्यक्ष जो बिडेन, व्हाईट हाऊसमधील सदस्य या भाषणाला उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे निराश झालेल्या ड्रेमोक्रॅटसमध्ये आपल्या भाषणाने त्यांनी उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
येत्या 20 जानेवारीला ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. प्रत्येक दिवस मी तुमच्याकडून शिकलो, तुम्ही मला एक चांगला राष्ट्राध्यक्ष चांगला माणूस बनवलत असे ओबामा म्हणाले. व्यक्तीगत स्वप्न पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य ही आपल्याला पूर्वजांकडून मिळालेली उत्तम भेट असल्याचे त्यांनी सांगितले. जिथून सुरुवात केली होती त्यापेक्षा अमेरिका आज चांगल्या, सुस्थितीत आहे. आज या स्टेवरुन निघताना उद्याच्या चांगल्या भविष्याचे आशादायी चित्र माझ्या मनात आहे.
तुमची सेवा करणे हा मला माझ्या आयुष्यात मिळालेला सन्मान होता. मी थांबणार नाही, नागरीक म्हणून तुमच्यात राहीन असे ओबामांनी सांगितले. पुढच्या 10 दिवसात आपल्या देशात लोकशाहीचा एक उत्तम नमुना दिसेल. लोकांनी निवडलेला एक राष्ट्राध्यक्ष दुस-या राष्ट्राध्यक्षाच्या हाती सत्ता सोपवेल. ही सर्व प्रक्रिया शांततेत पार पडेल असे त्यांनी सांगितले.
मी पाहिले आहे बदल तेव्हाच घडतो जेव्हा सामान्य लोक सक्रिय होतात असे ते म्हणाले. भेदभाव, वंशभेदापासून अमेरिकन लोकशाहीला धोका असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकन मुस्लिमांविरोधात भेदभाव मला मान्य नाही असे ते म्हणाले. दहशतवादाच्या विषयावर बोलताना ते म्हणाले की, इसिस नष्ट होईल, जे अमेरिकेला धमकावतात ते सुरक्षित राहू शकत नाही. मागच्या आठवर्षात एकाही परदेशी दहशतवादी संघटनेला अमेरिकेवर हल्ला करता आला नाही.