पाकिस्तानमधील ऐतिहासिक गुरु नानक महालाची मोडतोड, मौल्यवान सामान चोरले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 04:06 PM2019-05-27T16:06:36+5:302019-05-27T16:12:51+5:30
पाकिस्तानमध्ये अजून एका ऐतिहासिक वास्तूची मोडतोड झाली आहे.
लाहोर - पाकिस्तानमध्ये अजून एका ऐतिहासिक वास्तूची मोडतोड झाली आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात असलेल्या अनेक शतके जुन्या गुरू नानक महालाचा एक मोठा भाग स्थानिक व्यक्तींनी अधिकाऱ्यांच्या मुकसंमतीने तोडला. तसेच या महालाती मौल्यवान सामान विकून टाकल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार गुरू नानक महाल या चार मजली इमारतीमध्ये शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्यासह हिंदू राज्यकर्ते आणि राजकुमारांच्या तसबिरी होत्या.
दरम्यान, तेथील अधिकाऱ्यांना या महालाच्या मालकाबाबत काहीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. स्थानिक लोक या इमारतीला बाबा गुरू नानक महाल असे संबोधतात. भारतासह अनेक देशातील शीख येथे येत असत, असे स्थानिक नागरिक मोहम्मद अस्लम याने सांगितले. काही बड्या स्थानिक व्यक्तींकडून या वास्तूची तोडफोड सुरू आहे. मात्र कुठल्याही अधिकाऱ्याने काहीही कारवाई केलेली नाही. तसेच कुणीही येथे आलेला नाही. या भागातील बड्या लोकांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या मुकसंमतीने या वास्तूला उद्ध्वस्त केले. तसेच त्यातील मौल्यवान खि़डक्या दरवाजे, तावदाने आणि लाकडे विकून टाकली असे स्थानिक मोहम्मद अश्रफ यांनी सांगितले.
Pakistan media: 'Historical Guru Nanak palace’ partially demolished by locals in Narowal in Punjab province.Its construction comprised old bricks, sand, clay and limestone.
— ANI (@ANI) May 27, 2019
दरम्यान, हे वृत्त प्रकाशित करणाऱ्या डॉन या वृत्तपत्राने या इमारतीच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी या इमरातीत राहणाऱ्यांपासून ते सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांकडे चौकशी करण्यात आली. मात्र या इमारतीच्या मालकीबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, नरोवालचे उपायुक्त वहीद असगर यांनी सांगितले की, महसूल विभागाच्या नोंदींमध्ये या इमारतीचा कोणताही उल्लेख केलेला नाही. ही इमारत ऐतिहासिक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आम्ही नगरपालिका समितीच्या नोंदींचा तपास करत आहोत.