मेट्रो रेल्वेसाठी लाहोरमधलं ऐतिहासिक जैन मंदिर केलं जमीनदोस्त
By admin | Published: February 12, 2016 01:07 PM2016-02-12T13:07:54+5:302016-02-12T13:07:54+5:30
पाकिस्तानमधल्या लाहोरमधले ऐतिहासिक जैन मंदिर मेट्रो रेल्वेसाठी जमीनदोस्त करण्यात आले असून पाकिस्तानातल्या विरोधी पक्षांनी याचा निषेध केला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
अमृतसर, दि. १२ - पाकिस्तानमधल्या लाहोरमधले ऐतिहासिक जैन मंदिर मेट्रो रेल्वेसाठी जमीनदोस्त करण्यात आले असून पाकिस्तानातल्या विरोधी पक्षांनी याचा निषेध केला आहे. पंजाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते मियाँ मेहमूद उर रशीद यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रशीद यांनी या घटनेचा निषेध केला आहे आणि हे ऐतिहासिक मंदिर जतन का करण्यात आलं नाही असा सवाल विचारला आहे. पंजाब सरकारने ऑरेंज लाइन मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पासाठीजैन मंदिर, महाराजा बिल्डिंग आणि कपुरथाला हाऊस या इमारतीही जमीनदोस्त केल्या आहेत. मेट्रो रेल्वे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी लाहोरचा ऐतिहासिक वारसा असलेल्या जैन मंदिराचं जतन करणंही सरकारचं कर्तव्य होतं असं मत रशीद यांनी व्यक्त केल्याचं टाइम्सनं म्हटलं आहे.
पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ, पाकिस्तान मुस्लीम लीग (क्यू), जमात ए इस्लामी आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षांनी या घटनेचा निषेध केला आणि निदर्शने केली आहेत.
याआधीही जैन मंदिराला काहीवेळा संकटांना सामोरे जावे लागले होते. बाबरी पतनानंतर बदला म्हणून या मंदिराचा खूपसा भाग जमावाकडून तोडण्यात आला होता. नंतर अनेक दुकानदारांनी मंदिराच्या आवारात अतिक्रमण केले होते, तर मंदिराच्या एका खोलीत एक मदरसाही चालवण्यात येत होता.
सरकार एका समाजाविषयीच अलिप्त आहे असं नाही तर ते शहराच्या ऐतिहासिक वारशाविषयीही अनभिज्ञ असल्याची टीका रशीद यांनी केली आहे.