कमला हॅरिस यांनी रचला इतिहास, बनल्या अमेरिकेच्या पहिल्या महिला आणि भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष
By बाळकृष्ण परब | Published: January 20, 2021 11:44 PM2021-01-20T23:44:04+5:302021-01-21T00:07:04+5:30
Kamala Harris News : कॅपिटल हिल येथे झालेल्या सोहळ्यात कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.
वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांचा शपथविधी आज कॅपिटल हिल येथे संपन्न झाला. या सोहळ्यात कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. हॅरिस ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष तसेच पहिल्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या. हॅरिस ह्या अमेरिकेच्या ४९ व्या राष्ट्राध्यक्ष ठरल्या.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्याच्या सुरुवातीला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी उपराष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतली. दरम्यान, कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचे आजोळ असलेल्या तामिळनाडूमधील गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
US: Kamala Harris sworn-in as the first female Vice President of the United States of America. pic.twitter.com/fYEcCd5oD4
— ANI (@ANI) January 20, 2021
दरम्यान, नुकत्याच आटोपलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी आज अमेरिेकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे कडेकोट बंदोबस्तामध्ये झालेल्या सोहळ्यात बायडन यांना अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
अमेरिकेची यावेळची अध्यक्षीय निवडणूक आणि त्यानंतरची सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया कमालीची वादग्रस्त ठरली होती. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव समोर दिसू लागताच निवडणूक प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप केला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी वॉशिंग्टनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हिंसक गोंधळ घातला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रियाही सुरू झाली होती. दरम्यान, आज मी पुन्हा येईल, असे विधान करत ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसचा निरोप घेतला.