हिटलरचा फोन विकला २ लाख डॉलर्सना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2017 01:24 AM2017-02-21T01:24:20+5:302017-02-21T01:24:20+5:30
अॅडॉल्फ हिटलरने दुसऱ्या महायुद्धामध्ये लाखो लोकांच्या हत्येचे आदेश ज्या टेलिफोनवरून दिला होता, तो अलीकडेच लिलावात
वॉशिंग्टन : अॅडॉल्फ हिटलरने दुसऱ्या महायुद्धामध्ये लाखो लोकांच्या हत्येचे आदेश ज्या टेलिफोनवरून दिला होता, तो अलीकडेच लिलावात २ लाख डॉलर्सना ( १कोटी ६0 लाख ८३ हजार ६00 रुपये) विकला गेला. दुसऱ्या महायुद्धात हिटलरचा पराभव झाला होता. त्यानंतर १९४५ साली बर्लिनमधील एका बंकरमध्ये हा टेलिफोन सापडला होता.
अलेक्झांडर हिस्टोरिकल आॅक्शनने या टेलिफोनचा लिलाव लावताना, या टेलिफोनला २ ते ३ लाख डॉलर्स इतकी किंमत मिळेल, असा अंदाज लावला होता. प्रत्यक्ष लिलावात सुरुवातीची बोली १ लाख डॉलर्स ठेवण्यात आली होती. हा टेलिफोन कोणी विकत घेतला, त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र या लिलावात सहभागी झालेल्यांनी टेलिफोनमार्फतच बोली लावली होती.
काळ्या रंगाच्या या टेलिफोनला नंतरच्या काळात गडद लाल रंगाने रंगवून झळाळी देण्यात आली. शिवाय या टेलिफोनवर हिटलर हे नावही कोरण्यात आले. मेरीलँड कंपनीने या टेलिफोनबरोबरच अनेक वस्तूंचाही लिलाव केला. त्यात चिनी मातीच्या एका अल्सेशियन कुत्र्याचाही समावेश होता. तो कुत्रा २४ हजार ३00 डॉलर्स इतकी किंमतीत लिलावात विकला गेला. (वृत्तसंस्था)