पाकिस्तानच्या सिंधमध्ये एचआयव्हीचा उद्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 05:01 AM2019-05-29T05:01:41+5:302019-05-29T05:01:47+5:30
पाकिस्तान सरकारने सिंध प्रांतात नुकत्याच एचआयव्हीच्या झालेल्या उद्रेकाची चौकशी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडे (डब्ल्यूएचओ-हू) मदत मागितली आहे.
कराची : पाकिस्तान सरकारने सिंध प्रांतात नुकत्याच एचआयव्हीच्या झालेल्या उद्रेकाची चौकशी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडे (डब्ल्यूएचओ-हू) मदत मागितली आहे.
एचआयव्हीची बाधा ६०० पेक्षा जास्त जणांना झाली असून, त्यात बहुसंख्य मुले आहेत, असे प्रसारमाध्यमांनी म्हटले. देशाच्या वायव्येकडील लारकाना जिल्ह्यातील रातोदेरो गावात २१,३७५ जणांची तपासणी करण्यात आली त्यात ६८१ एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले. यापैकी ५३७ जण हे दोन ते १५ वयोगटातील आहेत.
एचआयव्हीची बाधा झाल्याचे कारण आरोग्य अधिकाऱ्यांनी अस्वच्छ उपकरणांचा वापर, असुरक्षितरीत्या एकाचे रक्त दुसºयाला देणे आणि भोंदू डॉक्टरांकडून होणारे बेसुमार गैरप्रकार असल्याचे सांगितले. जागतिक आरोग्य संघटना आणि रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्रांची १० जणांची तुकडी काही दिवसांत येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.
त्यानंतरच रातोदेरोतील या उद्रेकाचे नेमके कारण समजेल, असे पंतप्रधानांचे विशेष सहायक (राष्ट्रीय आरोग्य सेवा) जफर मिर्झा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
>काय आहेत कारणे?
अमेरिकेत सीडीसी ही सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आघाडीची संस्था असून, ती पाकिस्तानात अनेक सार्वजनिक आरोग्य संस्थांसोबत काम करते. एचआयव्हीची बाधा छाननी न केलेले रक्त व्यक्तीला देणे किंवा बाधित सिरिंजेसचा वापर (अनारोग्यकारी परिस्थितीत सिरिंजेसचा फेरवापर करणे किंवा त्या पुन्हा डब्यात भरणे हे तेथे नेहमीचे आहे) केल्यामुळे झाली, असे आम्ही गृहीत धरले आहे. तिसरे कारण म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध असू शकते, असे मिर्झा म्हणाले.आपल्या रुग्णांना विषाणू (व्हायरस) देत असल्याबद्दल पोलिसांनी गेल्या महिन्यात एका डॉक्टरला अटक केली होती. जिल्ह्यात १७ भोंदू डॉक्टरांनाही ताब्यात घेऊन त्यांचे दवाखाने सील केले गेले होते.