हिज्बुल मुजाहिद्दीनला अमेरिकेचा दणका, दहशतवादी संघटना घोषित करत घातली बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 09:20 PM2017-08-16T21:20:44+5:302017-08-16T22:03:30+5:30
काश्मीरमध्ये सातत्याने भारतविरोधी कारवाया करणारी दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनला अमेरिकेने दणका दिला आहे. अमेरिकेने आपल्या परदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा समावेश केला आहे. त्याबरोबरच या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करत अमेरिकेने तिच्यावर बंदी घातली आहे.
वॉशिंग्टन, दि, 16 - काश्मीरमध्ये सातत्याने भारतविरोधी कारवाया करणारी दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनला अमेरिकेने दणका दिला आहे. अमेरिकेने आपल्या परदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा समावेश केला आहे. त्याबरोबरच या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करत अमेरिकेने तिच्यावर बंदी घातली आहे. अमेरिकेने केलेली ही करवाई म्हणजे दहशतवादाच्या मुद्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा बुरखा फाडण्याच्या प्रयत्नांना मिळालेले मोठे यश म्हणून पाहिले जात आहे. तसेच दहशतवादी संघटनांच्या मदतीने काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नानांही या कारवाईमुळे धक्का बसला आहे.
या कारवाईबाबत अमेरिकेचा राजकोषीय विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, " अमेरिकेने पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना असलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनला परदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट केले आहे. त्यामुळे अमेरिकेमधीला या दहशतवादी संघटनेची कुठलीही संपत्ती अमेरिका जप्त करेल. तसेच या दहशतवादी संघटनेसोबत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यात येऊ नयेत, असे निर्देश अमेरिकी नागरिकांना देण्यात येतील.
याआधी जून महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्यापूर्वी अमेरिकेने हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. मात्र आपल्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा निर्णय म्हणजे मूर्खपणा असल्याचे त्याने म्हटले होते.
सय्यद सलाउद्दीन दहशतवादी नाही, पाकच्या उच्चायुक्तांनी केली पाठराखण
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनचा पुळका आला होता. ''पाकिस्तान सलाउद्दीनला दहशतवाद्याच्या स्वरुपात पाहत नाही. सलाउद्दीन काश्मिरींच्या अधिकारांसाठी लढत आहेत. जेथे पाकिस्तानचा मुद्दा आहे तर आम्ही सलाउद्दीनला एखाद्या दहशतवादी म्हणून पाहत नाही'', असे सांगत बासित यांनी सलाउद्दीनची पाठराखण केली होती. ज्यावेळी सलाउद्दीनची आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषणा करण्यात आली होती त्यावेळी देखील पाकिस्ताननं सलाउद्दीनचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. ''काश्मीरमधील नागरिकांच्या हक्काविषयी बोलणाऱ्याला दहशतवादी घोषित करणं अयोग्य आहे'', असे सांगत पाकिस्तानने सलाउद्दीनचा बचाव केला होता.