हस्तीदंत व गेंड्याच्या शिंगाची होळी
By admin | Published: May 2, 2016 01:56 AM2016-05-02T01:56:04+5:302016-05-02T01:56:04+5:30
हस्तीदंत तस्करांकडून हस्तगत केलेल्या १७२ दशलक्ष डॉलर किमतीच्या हस्तीदंताची व गेंड्याच्या शिंगाची केनिया सरकारने शनिवारी होळी केली. हस्तीदंत तस्करांची जराही गय न करण्याची
नैरोबी : हस्तीदंत तस्करांकडून हस्तगत केलेल्या १७२ दशलक्ष डॉलर किमतीच्या हस्तीदंताची व गेंड्याच्या शिंगाची केनिया सरकारने शनिवारी होळी केली. हस्तीदंत तस्करांची जराही गय न करण्याची ग्वाही राष्ट्राध्यक्ष उहूरू केन्याटा यांनी दिली आहे.
तस्करांकडून जप्त करण्यात आलेल्या या हस्तीदंताचे आणि गेंड्याच्या शिंगाचे १२ ढीग तयार करण्यात आले आणि नंतर त्याला आग लावण्यात आली. या आगीमुळे नैरोबी नॅशनल पार्कच्या आकाशात धुराचे आणि राखेचे लोट उठले होते. केनियाचे राष्ट्राध्यक्ष उहूरू केन्याटा यांनी अनेक आफ्रिकन देशांचे प्रमुख आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत या हस्तीदंत आणि गेंड्याच्या शिंगाना आगीच्या हवाली केले. जाळण्यात आलेल्या या अवैध हस्तीदंत व शिंगाची किंमत १७२ दशलक्ष डॉलर्स असल्याचे समजते.हस्तीदंत व शिंगाना आग लागताच उपस्थितांनी जल्लोष केला. या हस्तीदंत व शिंगाचे १२ मोठे ढीग बनविण्यात आले होते आणि प्रत्येक ढीग दहा ते बारा फूट उंचीचा होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तस्करांकडून हस्तगत करण्यात आलेले हस्तीदंत व शिंगाची होळी केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. (वृत्तसंस्था)