गृहमंत्री ‘आऊट’, माजी पंतप्रधान ‘इन’; ब्रिटनमध्ये सुनक यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 07:27 AM2023-11-14T07:27:37+5:302023-11-14T07:27:49+5:30
ब्रेक्झिटनंतर कॅमेरून यांनी जून २०१६ मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.
लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सोमवारी मंत्रिमंडळात फेरबदल केले. भारतीय वंशाच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांना याचा फटका बसला. त्यांची हकालपट्टी करून माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांना परराष्ट्रमंत्रिपद देण्यात आले आहे. सुएला यांच्या जागी परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेव्हरली यांची नियुक्ती झाली आहे.
ब्रेक्झिटनंतर कॅमेरून यांनी जून २०१६ मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. ४३ वर्षीय ब्रेव्हरमन यांची जागा परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेव्हरली यांनी घेतली असून, त्यामुळे ५७ वर्षीय कॅमेरून यांच्यासाठी परराष्ट्रमंत्रिपद रिकामे झाले. ब्रिटनच्या राजांकडून या नियुक्त्यांना परवानगी मिळाल्याचे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)
वादग्रस्त सुएला
सुनक यांच्या परवानगीशिवाय महानगरीय पोलिसांवर टीका करणारा सुएला यांचा एक वादग्रस्त लेख वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यापासून त्यांचे मंत्रिपद जाण्याची अटकळ बांधली जात होती. ४३ वर्षीय मूळ गोव्याच्या असलेल्या सुएला यांनी अलीकडेच ‘द टाइम्स’मधील एका लेखात इस्रायल - गाझा संघर्षावरून निषेध करणाऱ्यांना हाताळताना महानगरीय पोलिसांवर भेदभाव केल्याचा आरोप केला होता.