‘होमिंग फ्रॉम वर्क’: तो ऑफिसातच राहायला गेला !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 05:25 AM2022-03-23T05:25:29+5:302022-03-23T05:26:40+5:30

कंपनीमालक आपल्याला कमी पगार देतो आणि त्यात आपल्याला वाट्टेल तसं राबवून घेतो, याचा राग सायमनच्या मनात आधीपासूनच होता. यानिमित्तानं कंपनीवर बदला घेण्याची ही नामी संधी आहे, असं सायमनला वाटलं.

Homing from work Disgruntled over low salary US man lived in his office cubicle during work from home | ‘होमिंग फ्रॉम वर्क’: तो ऑफिसातच राहायला गेला !

‘होमिंग फ्रॉम वर्क’: तो ऑफिसातच राहायला गेला !

Next

कोरोना सुरू झाला आणि अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांना घरुन काम करावं लागलं. ‘वर्क फ्रॉम होम’ची एक नवीच पद्धत जगभरात रूढ झाली. आता अनेक ठिकाणी कर्मचारी पुन्हा कामावर परतले असले, तरी अजूनही बऱ्याच ठिकाणी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. त्याचे काही तोटे असले, तरी काही फायदेही आहेत. जगभरातल्या बहुतांश महिला कर्मचाऱ्यांनी या पद्धतीचं स्वागत केलं होतं, त्यात पुरुष कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. या पद्धतीमुळे बहुतांश कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या टिकल्या, तसेच उद्योगधंद्यांनाही अडचणीच्या काळात संजीवनी मिळाली.

पण काेरोनाकाळात एक घटना घडली, ती म्हणजे अनेकांचा रोजगार गेला, पण ज्यांच्या नोकऱ्या टिकल्या, त्यांना कमी पगारावर समाधान मानावं लागलं. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांचा पगार अजूनही पूर्ववत झालेला नाही.

कमी पगारात भागवायचं कसं, भलंमोठं घरभाडं भरायचं कसं, वीज बिल, पाणी बिल.. यातून सावरायचं कसं म्हणून अमेरिकेतील एका कर्मचाऱ्यानं एक अफलातून युक्ती केली. या कर्मचाऱ्याचं नाव आहे सायमन जॅकसन. कोरोनाकाळात बंद करण्यात आलेलं त्यांचं ऑफिस अजूनही बंदच आहे; पण कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची परवानगी दिलेली आहे. सर्व कर्मचारी अजूनही घरुनच काम करताहेत. अर्थातच सायमनचा त्यात समावेश आहे; पण ज्या ठिकाणी सध्या तो राहात होता, तिथला भाडेकरार नुकताच संपला, मूळ मालकानं घरभाडं वाढवून देण्याची मागणी केली, नाहीतर घर सोडायला सांगितलं.

- आता काय करावं?- सायमनसमोर मोठा प्रश्न उभा राहिला; पण लगेच त्याच्या डोक्यात एक आयडीयाही आली. आपलं ऑफिस कधीपासून बंदच आहे, हे त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यानं आपल्या भाड्याच्या घराला रामराम ठोकला आणि आपला बाडबिस्तारा सरळ आपल्या ऑफिसमधील क्युबिकलमध्ये हलवलं. ‘क्युबिकल’ म्हणजे ऑफिसात ज्या ठिकाणी आपण कामासाठी बसतो, त्याठिकाणी पार्टिशन टाकून बनवलेली छोटीशी जागा. या ठिकाणी प्रत्येकासाठी छोटासा टेबल आणि ड्रॉवर्स असतात. कंपनीमालक आपल्याला कमी पगार देतो आणि त्यात आपल्याला वाट्टेल तसं राबवून घेतो, याचा राग सायमनच्या मनात आधीपासूनच होता. यानिमित्तानं कंपनीवर बदला घेण्याची ही नामी संधी आहे, असं सायमनला वाटलं. त्यानं आपले कपडेकुपडे गोळा केले, ऑफिसमध्ये गेला. हे सगळे कपडे टेबलाच्या खणांमध्ये कोंबले. आपली स्लीपिंग बॅग मोकळी करुन ऑफिसात असलेल्या बाकावर पसरली. ऑफिसमधल्याच बाथरुम, संडासचा सर्रास वापर करायला सुरुवात केली. जणू काही आपलं स्वत:चंच घर असल्यासारखा ‘राजेशाही’ पद्धतीनं तो तिथे राहायला लागला. आपण किती भारी आयडिया केली, मालकाचं कसं उट्टं काढलं, म्हणून मनोमन तो खुश झाला. या आनंदाच्या भरात त्यानं सोशल मीडियावर आपल्या या कृतीचे फोटो आणि असंख्य व्हिडिओही शेअर केले. ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना असते, त्याप्रमाणे माझीही ‘होमिंग फ्रॉम वर्क’ अशी संकल्पना असल्याचं सांगत #homingfromwork या हॅशटॅगखाली त्यानं शेअर केलेले फोटो अल्पावधीतच प्रचंड व्हायरल झाले. लोकांनी त्याच्या कल्पनेला आणि ‘हिमती’ला दाद दिली. अनेकांनी ते एक-दुसऱ्याला शेअर केले. कंपनीला चुना लावण्याची आणि कंपनीच्या ऑफिसलाच आपलं घर बनवायची सायमनची ही कल्पना भावल्यामुळे त्याच्या सोशल मीडिया फॉलोअर्स आणि चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली. तो जणू काही ‘सोशल मीडिया स्टार’ झाला.. सायमनलाही एकदम भारी वाटलं. अशी अफलातून आयडिया सुचल्याबद्दल त्यानं स्वत:च आपली पाठ थोपटून घेतली. सायमनचं ऑफिस अजून काही महिने तरी उघडण्याची चिन्हं नव्हती, त्यामुळे बराच काळ इथे आपल्याला फुकटात राहाता येईल, असं त्याला वाटत होतं.. पण हाय रे दुर्दैव... सायमननं शेअर केलेले  फोटो, व्हिडिओ त्याच्या बॉसपर्यंतही पोहोचले. त्याच्या रागाचा पारा चढला. व्हिडिओ शेअर केल्यानंतर चौथ्या दिवशीच कंपनीच्या ‘एचआर’ विभागाच्या हेडचा त्याला फोन आला.. ‘ऑफिसमध्ये तू हे काय चालवलं आहेस? ऑफिसच्या ड्रॉवर आणि डेस्कमध्ये कोंबलेलं तुझं बाडबिस्तार तातडीनं आवर आणि सोशल मीडियावर जे फोटो, व्हिडिओ तू शेअर केले आहेस, तेही तातडीनं डिलीट कर.. नाहीतर तुला कायमचा घरचा रस्ता धरावा लागेल..

सायमनही तेवढाच खमक्या.. त्यानं ऑफिसमधलं आपलं सारं बाडबिस्तार तर आवरलं; पण कंपनी कर्मचाऱ्यांना कमी पगारावर कसं राबवून घेते, हे जगजाहीर करत कंपनीलाच रामराम ठोकला! 

आता सोशल मीडियाचा आधार! 
सायमननं आता सिएटल येथील ‘एअर बीएनबी’च्या एका रुममध्ये आपला मुक्काम हलवला आहे. दुसऱ्या एखाद्या चांगल्या जॉबची अपेक्षा तर त्याला आहेच; पण आपल्या व्हिडिओंना लोकांनी सोशल मीडियावर जो प्रतिसाद दिलाय, ते पाहून सोशल मीडियावरच काहीतरी करावं, ‘सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर’ व्हावं, असं त्याला आता वाटायला लागलं आहे. त्यामुळे कोणाची चाकरी आपल्याला करावी लागणार नाही आणि सोशल मीडियावरील चाहते आपलं भविष्य घडवतील, असा भरवसा त्याला वाटू लागला आहे.

Web Title: Homing from work Disgruntled over low salary US man lived in his office cubicle during work from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.