हनी आणि बॅरी शर्मन : थरारक ‘मर्डर मिस्ट्री’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 09:36 AM2023-01-02T09:36:08+5:302023-01-02T09:37:25+5:30
कॅनडाच्या आर्थिक आणि सामाजिक योगदानातही या दाम्पत्याचा, त्यांच्या कुटुंबाचा आणि त्यांच्या कंपनीचा वाटा फार मोठा आहे. हनी शर्मन तर आपल्या दानशूरत्त्वाबद्दल कॅनडामध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. आपल्या संपत्तीतला खूप मोठा वाटा त्यांनी सामाजिक कार्यासाठी वापरला.
काही गोष्टी आपल्याला अतिशय चक्रावून टाकतात. त्या का घडल्या, त्यामागचं कारण काय, याविषयीही आपल्याला अतिशय कुतूहल वाटत राहतं. कारण, बऱ्याचदा त्यामागची कारणंच उजेडात येत नाहीत. कॅनडामध्ये घडलेली अशीच एक घटना. बॅरी शर्मन आणि त्यांची पत्नी हनी शर्मन हे कॅनडातील सर्वाधिक श्रीमंत कुटुंबातील एक. बॅरी शर्मन यांनी १९७४मध्ये ‘एपोटेक्स’ या औषध कंपनीची सुरुवात केली आणि बघता बघता जगातील ती सर्वांत माठी औषध कंपनी बनली. कॅनडाच्या आर्थिक आणि सामाजिक योगदानातही या दाम्पत्याचा, त्यांच्या कुटुंबाचा आणि त्यांच्या कंपनीचा वाटा फार मोठा आहे. हनी शर्मन तर आपल्या दानशूरत्त्वाबद्दल कॅनडामध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. आपल्या संपत्तीतला खूप मोठा वाटा त्यांनी सामाजिक कार्यासाठी वापरला.
‘अजातशत्रू’ म्हणून हे दाम्पत्य आणि त्यांचं कुटुंब ओळखलं जात होतं; पण १५ डिसेंबर २०१७ रोजी टोरोंटो येथील त्यांच्या राहत्या घरी या दोघांचाही मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. नेमकं काय झालं असावं? त्यांचा खून झाला, त्यांनी आत्महत्या केली? त्यांच्यावर कोणी पाळत ठेवून हे दुहेरी हत्याकांड केलं? या घटनेला आता तब्बल पाच वर्षे झाली; पण या मृत्यूंमागचं रहस्य अजूनही उजेडात आलेलं नाही. शर्मन दाम्पत्याचे कुटुंबीय तर यावरून अक्षरश: चक्रावलेले आहेत. पोलिसांकडून गेली पाच वर्षे या मृत्यूंची चौकशी चालू आहे; पण अद्याप कोणतेही धागेदोरे त्यांना सापडलेले नाहीत.
या मृत्यूचं रहस्य ते अद्याप उलगडू शकलेले नाहीत. मात्र, त्याचवेळी त्यांचे कुटुंबीयही स्वस्थ बसलेले नाहीत. शर्मन दाम्पत्याचा मृत्यू झाल्याबरोबर त्यांच्या कुटुंबीयांनी हे रहस्य शोधून काढणाऱ्याला तब्बल दहा दशलक्ष डॉलर्सचं इनाम जाहीर केलं होतं. पण, पाच वर्षे उलटूनही या हत्येच्या तपासात काहीही प्रगती झाली नसल्याचं पाहून काही दिवसांपूर्वीच त्यांनी बक्षिसाची रक्कम आणखी २५ दशलक्ष डॉलर्सनं वाढवून नुकतीच ३५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे २९० कोटी रुपये इतकी केली आहे. यामुळे अब्जाधीश दाम्पत्याच्या रहस्यमय मृत्यूचं हे प्रकरण संपूर्ण जगात पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
बॅरी शर्मन आणि हनी शर्मन या दाम्पत्याचा मृत्यू झाला, त्यावेळी त्यांचं वय अनुक्रमे ७५ आणि ७० वर्षे होतं. त्यांच्या अंत्यविधीसाठी हजारो सर्वसामान्य लोकांचा जनसमुदाय लोटला होता आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोहेदेखील अंत्यविधीसाठी जातीनं हजर होते, यावरून कॅनडामध्ये सामान्य जनतेत आणि देशाच्या धुरिणांमध्ये शर्मन दाम्पत्याचं असलेलं स्थान अधोरेखित होतं. या दाम्पत्यानं केवळ सामाजिक कार्यासाठीच तब्बल ५० दशलक्ष डॉलर्स दान म्हणून दिले होते. याशिवाय इतर गरजू, गोरगरीब आणि उभरत्या उद्योजकांना त्यांनी केलेली मदत वेगळीच. त्यामुळेच कॅनडाच्या जनतेत या दाम्पत्याचं स्थान अतिशय आदराचं होतं. या दाम्पत्याचा मृत्यू झाला, त्यावेळी त्यांची संपत्ती तीन अब्ज डॉलर्स इतकी होती.
जमीन खरेदी - विक्रीचा व्यवहार करणाऱ्या एका व्यक्तिला शर्मन यांच्या मृत्यूची माहिती सर्वांत पहिल्यांदा कळली. तो त्यावेळी त्यांच्या घरी आला होता. मृत्यूसमयी शर्मन दाम्पत्य त्यांच्या नेहमीच्या पोशाखात होतं, एकमेकांच्या शेजारीच बसलेल्या अवस्थेत ते होते; पण त्यांच्या गळ्याला बेल्ट बांधण्यात आलेला होता. हा बेल्ट त्यांच्या इनडोअर स्विमिंग पूलच्या रेलिंगला जोडलेला होता.
शवविच्छेदन अहवालात या दाम्पत्याचा गळा दाबून मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं. मात्र, त्यावेळी पोलिसांचं म्हणणं होतं की, त्यांच्या घरात जबरदस्तीनं कोणी प्रवेश केल्याची कोणतीही चिन्हं नाहीत. त्यामुळे या दोघांनीही आत्महत्या केली असावी. मात्र, ते स्वत:ही त्याविषयी ठाम नव्हते. कदाचित त्यांची हत्या झाली असावी, असंही त्यांना वाटत होतं. दुहेरी हत्याकांडाचे ते बळी असावेत, असाही निष्कर्ष त्यांनी काढला; पण गेल्या पाच वर्षांत तपासात मात्र ते काहीही प्रगती करू शकले नाहीत. गेल्यावर्षी पोलिसांनी जाहीर केलं, शर्मन दाम्पत्याचा मृत्यू झाल्याच्या आदल्या दिवशी एक माणूस संशयास्पद स्थितीत त्यांच्या घराजवळ फिरत होता; पण त्यातही पुढे काहीच प्रगती झाली नाही.
मृत्यूचं गूढ जनताच सोडवणार!
या मृत्यूचं रहस्य उलगडण्यासाठी पोलिसांसह साऱ्यांचीच मदार आता सामान्य जनतेवरच आहे. पोलिसांसह शर्मन कुटुंबीयांनीही जनतेला आवाहन केलं आहे, तुमच्याकडे या मृत्यूसंबंधी कोणतीही माहिती असल्यास किंवा त्या संशयास्पद व्यक्तीची माहिती मिळाल्यास आम्हाला कळवा. त्याचं योग्य ते इनाम आम्ही तुम्हाला देऊ. शर्मन दाम्पत्याचा मुलगा जोनाथन शर्मन याचं म्हणणं आहे, माझ्या आई - वडिलांच्या मृत्यूनंतरचा प्रत्येक दिवस आमच्यासाठी एक दु:स्वप्न होतं. मारेकऱ्यांना शिक्षा झाल्याशिवाय आम्हाला स्वस्थता मिळणार नाही.