फेसबुकवरील हनीमूनचे फोटो हटवा, कोर्टाने महिलेला फटकारले
By Admin | Published: August 18, 2014 12:13 PM2014-08-18T12:13:54+5:302014-08-18T12:14:54+5:30
पतीच्या परवानगीशिवाय हनीमूनचे छायाचित्र फेसबुकवर टाकणे इटलीतील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. इटलीतील कोर्टाने महिलेला फेसबुकवरील हनीमूनचे फोटो काढायचे आदेश दिले आहेत.
ऑनलाइन लोकमत
नॅपल्स (इटली), दि. १८ - पतीच्या परवानगीशिवाय हनीमूनचे फोटो फेसबुकवर टाकणे इटलीतील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. इटलीतील कोर्टाने महिलेला फेसबुकवरील हनीमूनचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले असून यासाठी महिलेने पतीला आर्थिक नुकसान भरपाईदेखील द्यावी असे कोर्टाने म्हटले आहे.
इटलीतील नॅपल्स येथे राहणा-या महिलेने हनीमूनचे फोटो तिच्या फेसबुक अकाऊंटवर टाकले होते. दहा वर्षांपूर्वी काढलेल्या या फोटोमध्ये दोघेही एकमेकांना मिठी मारताना आणि चूंबन देताना दिसत होते. हा प्रकार महिलेच्या पतीला रुचला नाही आणि त्याने पत्नीविरोधात थेट कोर्टात धाव घेतली. पत्नीने खासगी आयुष्यातील फोटो सार्वजनिक करुन इटलीतील 'राईट टू प्रायव्हसी' या मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्याचे पतीचे म्हणणे होते. तर फेसबुक हे आधुनिक तंत्रज्ञान असून त्यावर फोटो टाकणे गैर नाही असे महिलेचे म्हणणे होते. नॅपल्समधील कोर्टाने पतीच्या वकिलाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धऱत महिलेला हनीमूनचे फोटो फेसबुकवरुन काढून टाकण्याचे आदेश दिले. तसेच महिलेने तिच्या पतीला आर्थिक नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत.