पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पॅलेस्टाइनचा ‘ग्रँड कॉलर’ सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:39 AM2018-02-11T00:39:03+5:302018-02-11T00:39:10+5:30
दोन देशातील संबंध वाढविण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान पाहता पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी मोदी यांना ‘ग्रँड कॉलर आॅफ द स्टेट आॅफ पॅलेस्टाइन’ने सन्मानित केले. द्विपक्षीय बैठकीनंतर राष्ट्रपती अब्बास यांनी मोदी यांचा सन्मान केला. पॅलेस्टाइनचा दौरा करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
रामल्ला : दोन देशातील संबंध वाढविण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान पाहता पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी मोदी यांना ‘ग्रँड कॉलर आॅफ द स्टेट आॅफ पॅलेस्टाइन’ने सन्मानित केले. द्विपक्षीय बैठकीनंतर राष्ट्रपती अब्बास यांनी मोदी यांचा सन्मान केला. पॅलेस्टाइनचा दौरा करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
ग्रँड कॉलर हा विदेशातील प्रतिष्ठित व्यक्ती, राजे, राज्य व सरकारचे प्रमुख यांना दिला जातो. यापूर्वी हा सन्मान सौदी अरबचे राजे सलमान, बहरीनचे राजे हमाद, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आदींना दिलेला आहे. मोदी यांचे कुशल नेतृत्व, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उंची तसेच, पॅलेस्टाइन-भारत संबंधांना चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यावेळी कौतुक करण्यात आले. या क्षेत्रात शांतता कायम ठेवण्यासाठी व आमच्या नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या समर्थनासाठी मोदी यांचा सन्मान केल्याचे सन्मानपत्रात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
तिरंग्याच्या रंगात बुर्ज खलिफा
दुबई : पंतप्रधान मोदी यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमीरातमधील बुर्ज खलिफा ही इमारत भारताच्या तिरंगी झेंड्याच्या प्रकाशात उजळून गेली होती. मोदी शनिवारी रात्री अबुधाबीत पोहचणार आहेत. प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयन यांची ते भेट घेतील. पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशीद अल मकतौम यांच्याशीही ते चर्चा करतील.