व्हाईट हाऊसच्या संपर्क संचालक होप हिक्सची राजीनाम्याची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 05:59 AM2018-03-02T05:59:57+5:302018-03-02T05:59:57+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहयोगी होप हिक्स यांनी व्हाईट हाऊसच्या संपर्क संचालकपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहयोगी होप हिक्स यांनी व्हाईट हाऊसच्या संपर्क संचालकपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. होप (२९) यांनी गत तीन वर्षात विविध क्षेत्रात काम केले आहे. ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेच्या प्रवक्त्या आणि २० जानेवारी २०१७ पासून त्या संपर्क संचालक म्हणून कार्यरत आहेत.
२०१६ मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाच्या आरोपात ‘हाऊस इंटेलिजेंस कमेटी’च्या समोर हजर झाल्यानंतर एक दिवसानंतरच त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे, हे विशेष. अर्थात, त्यांच्या राजीनाम्याची तारीख व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आली नाही. पण, असे स्पष्ट करण्यात आले आहे की, आगामी काही आठवड्यात त्या या पदावरुन जाणार हे निश्चित आहे.
होप या दीर्घकाळापासून ट्रम्प यांच्यासोबत काम करत आहेत. निवडणुकीच्या काळात आणि नंतरही त्या ट्रम्प यांच्यासोबत कार्यरत आहेत. ट्रम्प यांच्याशी संपर्क करुन राजीनामा देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याबाबत ट्रम्प यांनी म्हटले आहे की, होप एक व्यक्ती म्हणून चांगल्या आहेत. गत तीन वर्षात त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. त्या अतिशय बुद्धिमान आहेत. (वृत्तसंस्था)
>व्हाईट हाऊसला धक्का
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासार्ह सहकारी म्हणून ज्यांची ओळख आहे त्या होप हिक्स यांच्या राजीनाम्याच्या घोषणेमुळे व्हाईट हाऊस आणि ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
माजी मॉडल ते ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेतील एक प्रमुख अशा विविध क्षेत्रात संचार करुन त्या सध्या संपर्क संचालक हे महत्वाचे पद सांभाळत होत्या.