मॉस्कोतील म्युझिक कॉन्सर्टमध्ये ISIS कडून भीषण हल्ला; 60 जणांचा मृत्यू, 145 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 08:21 AM2024-03-23T08:21:45+5:302024-03-23T08:22:20+5:30
ISIS Attack on Moscow update: गेल्या काही वर्षांपासून आयएसआयएसच्या दहशतवादी कारवाया थंडावल्या होत्या. परंतु, मॉस्कोच्या हल्ल्याने पुन्हा या क्रूर दहशतवादी संघटनेने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.
दहशतवादी संघटना आयएसआयएसने शुक्रवारी रात्री मॉस्कोतील क्रॉकस कॉन्सर्ट हॉलमध्ये भयावह गोळीबार व बॉम्बस्फोट घडवून आणला. या भीषण दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला असून १४५ जण जखमी झाले आहेत. सुरुवातीला रशिया-युक्रेन युद्धातून हल्ला झाल्याचे वाटत असताना आयएसआयएसने टेलिग्राम चॅनलवरून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत जगाला हादरवरून सोडले आहे.
गेल्या काही वर्षांपासून आयएसआयएसच्या दहशतवादी कारवाया थंडावल्या होत्या. परंतु, मॉस्कोच्या हल्ल्याने पुन्हा या क्रूर दहशतवादी संघटनेने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. टेलिग्राम चॅनलवर जारी केलेल्या वक्तव्यामध्ये हल्लेखोर सुरक्षितरित्या त्यांच्या घरी परतले आहेत, असे म्हटले आहे.
दरम्यान रशियन मीडियाने दहशतवाद्यांचे फोटो प्रकाशित केले आहेत. हल्लेखोर आशियाई आणि कॉकेशियाई लोकांसारखे दिसत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच रशियन नाही तर परदेशी भाषेमध्ये बोलत होते. रशियन प्रसारमाध्यमांनुसार हे दहशतवादी इन्गुशेतियाचे मुळ रहिवासी आहेत. सैन्यासारख्या वेशात ते आतमध्ये आले होते व गोळीबार सुरु केला. बॉम्बफेकल्याने हॉलमध्ये आग लागली. दिसेल त्याला त्यांनी गोळ्या झाडल्या.
कॉन्सर्ट हॉलमध्ये या हल्ल्यावेळी ६२०० लोक उपस्थित होते. एका म्युझिक शोसाठी ते आले होते. रशियाने आंतरराष्ट्रीय संघटनेला या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे.
दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या वरिष्ठ सल्लागारांनी मॉस्कोवरील हल्ल्यात आमचा हात नसल्याचे म्हटले आहे. आमचे चारही बाजुंनी रशियन सैन्यासोबत युद्ध सुरु आहे. आम्ही कोणत्याही परिणामांची पर्वा केल्याशिवाय मैदानात लढत राहू, असे त्यांनी म्हटले आहे.