बापरे ! चक्क किचनच्या सिंकमधून निघाला साप, त्यानंतर घडलं असं काही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 12:20 PM2020-05-07T12:20:43+5:302020-05-07T12:20:43+5:30
जुवेनाइल ईस्टर्न बाऊन जातीचा विषारी साप होता. त्यानंतर सर्पमित्राच्या मदतीने हा साप घराबाहेर काढण्यात आला.
घरातील किचनच्या वॉश बेसिनमधून कॉक्रोच बाहेर येत असल्याचे बऱ्याच जणांनी पाहिलं असेल. पण किचनच्या सिंकमधून कधी चक्क साप बाहेर आलेला पाहिला आहे का?, विचार करूनही घाबरगुंडी उडाली ना. असेच काहीसे ऑस्ट्रेलियामध्ये घडले ज्याने सा-यांनाच चांगली धडकी भरवली. ऑस्ट्रेलियामधील क्विन्सलँडमध्ये राहणा-या मायकल हेलार्डबरोबर हा थरकाप उडवणारा प्रसंग घडला आहे.
मायकल नेहमीप्रमाणे किचनच्या वॉश बेसिन सिंकमध्ये भांडी घासत होता.अचानक सिंकमध्ये लावलेल्या जाळीतून सापाचे तोंड दिसले. आतमध्ये काय आहे हे पाहण्यासाठी मायकलने जाळी थोडी सरकवली, बघतो तर काय तिथे चक्क जिवंत साप बसला होता. सापाला पाहून मायकेलची चांगलीच बोबडी वळाली होती.
सापाला पाहताच त्याला काहीच सुचेना, हळूहळू साप सिंकच्या आतून बाहेर येत होता आणि त्याला काय करावे हे सुचेनासे झाले. मायकल आणि सापात अंतरही खूपच कमी होते. मायकलने परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला, जराही हालचाल न करता तो तसाच स्तब्ध उभा राहिला. सिंकच्या आत हात घालणार तेवढ्यात साप त्याच्या हाताजवळ आला. हा साधा साप नव्हता, तर जुवेनाइल ईस्टर्न बाऊन जातीचा विषारी साप होता. त्यानंतर सर्पमित्राच्या मदतीने हा साप घराबाहेर काढण्यात आला.
मायकलने सांगितले की, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्कादायक प्रसंग होता. मी देवाचे आभार मानतो की मला काहीही झाले नाही. मायकलने हा प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला. या सापाचे फोटोदेखील शेअर केलेत. हे फोटो पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने तर म्हटले की, माझ्या किचन वॉश बेसिनमधून साधा किडादेखील येणार नाही, अशी व्यवस्था करेन. तर, एकीने लिहिले की, बाप रे हे सगळे वाचून मी तर आता भांडीच घासणार नसल्याचे म्हटले आहे. ईस्टर्न बाऊन साप हा जगातील दुसरा सर्वात विषारी साप मानला जातो. या लहान सापाचे विष अत्यंत विषारी असते. रेप्टाइल म्युझियम ऑस्ट्रेलियाच्या नुसार या सापाच्या दंशाने मृत्यू झालेल्यांची संख्याही अधिक आहे.