हॉट एअर बलून वीजतारांना धडकून दोन ठार, एक बेपत्ता
By admin | Published: May 11, 2014 06:03 PM2014-05-11T18:03:25+5:302014-05-12T00:30:50+5:30
अमेरिकेत एक हॉट एअर बलून वीजवाहिनीस धडकून झालेल्या दुर्घटनेमध्ये दोन जण मृत्युमुखी पडले, तर तिसरा बेपत्ता आहे.
डॉस्वेल : अमेरिकेत एक हॉट एअर बलून वीजवाहिनीस धडकून झालेल्या दुर्घटनेमध्ये दोन जण मृत्युमुखी पडले, तर तिसरा बेपत्ता आहे.
या बलूनमध्ये तीन जण होते. वीजवाहिनीस धडकून त्याला आग लागली. बलूनचे उड्डाण पाहण्यासाठी जमलेल्या शेकडो लोकांसमोर ही भयंकर दुर्घटना घडली.
हा बलून मध्य व्हर्जिनियातील एका शेतावर उडत होता. बेपत्ता व्यक्ती आणि बलूनच्या अवशेषांचा १०० जण शोध घेत आहेत. आतापर्यंत मृतदेहांची ओळख पटविता येऊ शकलेली नाही.
ही घटना पाहणार्यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री हा बलून वीजवाहिनीवर धडकून त्याला आग लागली. त्यानंतर लोक मदतीसाठी आरडाओरड करू लागले.
जॉन्सन यांनी सांगितले की, जमिनीवर एकदम शांतता पसरली होती. लोक प्रार्थना करत होते. अतिशय भीतिदायक वातावरण होते. बलून महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वीच ही दुर्घटना घडली. मीडो इव्हेंट पार्क येथून तीन बलून उडाले होते. त्यांना जवळच उतरायचे होते. दोन बलून सुरक्षितरीत्या उतरले मात्र तिसरा वीजवाहिनीला धडकला.
बलूनच्या चालकाने बलूनवर नियंत्रण ठेवण्यासह आग विझविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी बलूनमधील दोन व्यक्तींनी खाली उड्या घेतल्या किंवा ते खाली कोसळले असावेत, असे राज्य पोलीस दलाचे प्रवक्ता कोरिन गेलर यांनी सांगितले. आग भडकतच होती. काही वेळाने पुन्हा स्फोटाचा आवाज ऐकू आला. तोपर्यंत बलून आणि त्याचे आसन वेगवेगळे झाले होते.