भारतात वास्तव्यास असलेल्या अमेरिकन नागरिकांनी कर कसे भरावे?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 08:00 PM2020-04-20T20:00:07+5:302020-04-20T20:00:27+5:30
तुम्ही अमेरिकेचे नागरिक किंवा ग्रीन कार्डधारक असाल, तर तुमच्यासाठी असलेले कर भरण्याचे नियम सारखेच असतात. मग तुम्ही अमेरिकेत असा किंवा परदेशात, त्यात बदल होत नाही.
प्रश्न- मी अमेरिकेचा नागरिक असून भारतात वास्तव्यास आहे. मला अमेरिकेचा कर केव्हापर्यंत भरावा लागेल? मला कोणते कर भरावे लागतील? ते मी कसे भरावे?
उत्तर- तुम्ही अमेरिकेचे नागरिक किंवा ग्रीन कार्डधारक असाल, तर तुमच्यासाठी असलेले कर भरण्याचे नियम सारखेच असतात. मग तुम्ही अमेरिकेत असा किंवा परदेशात, त्यात बदल होत नाही.
यंदा कर भरण्याची मुदत १५ एप्रिल २०२० ते १५ जुलै २०२० अशी वाढवण्यात आली आहे. अमेरिकन नागरिक कोणत्याही दंड आणि व्याजाशिवाय १५ जुलैपर्यंत आयकर भरू शकतात. ही नवी मुदत मिळवण्यासाठी अंतर्गत महसूल सेवेशी (आयआरएस) संपर्क साधण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला कर भरण्यासाठी अतिरिक्त मुदत (१५ जुलैनंतर) हवी असल्यास कर व्यवसायिकाच्या किंवा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म ४८६८ भरू शकता.
तुम्हाला अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या नागरिकांप्रमाणेच आयकर, मालमत्ता कर आणि भेटवस्तू कर भरावे लागतात. तुमचं उत्पन्न, फायलिंग स्टेटस आणि वय यावरुन तुम्ही कर भरणार की नाही ते ठरतं. याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आयआरएसच्या ५४ क्रमांकाच्या फॉर्ममध्ये मिळू शकते. यामध्ये अमेरिकेत आणि परदेशात वास्तव्यास असलेल्या करभरण्याशी संबंधित माहिती आहे. तुम्ही परदेशात वास्तव्यास असाल, तर तुम्हाला जगभरातून मिळणारं उत्पन्न करपात्र असतं. तुम्हाला राज्याचा कर भरावा लागण्याची गरज आहे का याबद्दलची माहिती राज्याच्या संकेतस्थळावर तपासून पाहू शकता.
याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आयआरएसच्या वेबपेजवर जा. irs.gov संकेतस्थळावरील यूएस सिटिझन्स अँड रेसिडेन्ट एलियन्स अब्रॉडला भेट द्या. आयआरएसचं फिलाडेल्फियामधलं कार्यालय आंतरराष्ट्रीय कराबद्दल सहकार्य करतं. अमेरिकेच्या भारतातल्या दुतावास आणि वकिलातींच्या संकेतस्थळावर भारतातल्या कर आणि आर्थिक सेवा पुरवठादारांची माहिती उपलब्ध आहे.