अमेरिकचा व्हिसा मिळवून देण्याची खोटी आश्वासनं देणाऱ्या ट्रॅव्हल एजंटची तक्रार कशी करू शकतो?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 08:55 PM2020-05-30T20:55:24+5:302020-05-30T21:03:54+5:30
अमेरिकेचा व्हिसा मिळवून देण्याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. अमेरिकन दुतावासातील अधिकारी मुलाखत घेऊन व्हिसाच्या अर्जावर निर्णय घेतो. यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा समावेश नसतो.
प्रश्न- माझा शेजारी ट्रॅव्हल एजंट आहे. तो त्याच्या ग्राहकांना बोगस रोजगार पत्रं देऊन अमेरिकेचा व्हिसा मिळवून देण्याची खात्र देत असल्याचं माझ्या निरीक्षणात आलं आहे. कधी कधी त्याच्या ग्राहकांना व्हिसा मिळत नाही. मग ते शेजारी येऊन गोंधळ घालतात. ट्रॅव्हल एजंट व्हिसाची खात्री देऊ शकतो का? खोटी आश्वासनं दिल्याबद्दल आणि बोगस कागदपत्रं पुरवल्याबद्दल मी त्याची तक्रार कशी करू शकतो?
उत्तर: अमेरिकेचा व्हिसा मिळवून देण्याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. अमेरिकन दुतावासातील अधिकारी मुलाखत घेऊन व्हिसाच्या अर्जावर निर्णय घेतो. यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा समावेश नसतो. व्हिसा मिळवून देण्याची खात्री देऊन कोणीही अर्जदाराला उत्तरं सुचवत असेल किंवा खोटी कागदपत्रं पुरवत असेल, तर अर्जदारांनी सतर्क राहायला हवं. खोटी कागदपत्रं पुरवणाऱ्या किंवा स्वत:बद्दल चुकीची माहिती देणाऱ्या अर्जदारांना कायमस्वरुपी अपात्र ठरवलं जाऊ शकतं. सर्व प्रकारच्या व्हिसासाठी ही कारवाई केली जाऊ शकते.
दुतावासातील अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना नेहमी प्रामाणिकपणे उत्तरं द्या. अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरं द्या. तुम्ही विश्वासार्ह आणि पात्र आहात, हे त्यातून अधिकाऱ्यांना समजेल.
माहिती लपवणं किंवा चुकीची माहिती देणं किंवा नोकरीशी संबंधित खोटी कागदपत्रं, शैक्षणिक पदवी किंवा अर्जदाराबद्दल विश्वासार्हता वाढवण्यासाठी खोटी प्रमाणपत्रं दाखवणं अशा गोष्टींना ट्रॅव्हल एजंटनं कधीही प्रोत्साहन देऊ नये.
अमेरिकेचा व्हिसा मिळवून देण्याची खात्री देणारे ट्रॅव्हल एजंट्स किंवा कोणीही व्यक्ती ज्यांच्याबद्दल तुम्हाला संशय असल्यास त्यांची तक्रार करा. MumbaiF@state.gov वर तुम्ही याबद्दलची गोपनीय तक्रार करू शकता. तुम्ही याबद्दल तक्रार दाखल केल्यास अमेरिकन दुतावास तुमची ओळख उघड होऊ देणार नाही आणि तुमच्या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेईल याची खात्री बाळगा. फसवणूक करणाऱ्या किंवा तसा संशय असलेल्या व्यक्तीचा तपशील आणि माहिती ई-मेलमध्ये द्या. याबद्दलची कागदपत्रं किंवा पुरावे असल्यास तेदेखील तुम्ही जोडू शकता.