चाबहार कोणत्या सुवर्णसंधीचे द्वार उघडणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 02:02 PM2017-08-08T14:02:13+5:302017-08-08T15:35:45+5:30

चाबहार हे बंदर सिस्तान-बलुचिस्तान प्रांतामध्ये आहे. चाबहारचा इतिहास ख्रिस्तपुर्व 2500 वर्षांपासूनचा असून अलेक्झांडर, पोर्तुगिज, मंगोलांनीही येथे सत्ता गाजवलेली होती. भारत अफगाणिस्तान आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या त्रिपक्षीय करारामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे

How Chabahar would help India ? | चाबहार कोणत्या सुवर्णसंधीचे द्वार उघडणार ?

चाबहार कोणत्या सुवर्णसंधीचे द्वार उघडणार ?

Next
ठळक मुद्देचाबहारमध्ये शहिद कलंतरी आणि शहिद बेहेष्ती अशी दोन बंदरे आहेत चाबहार बंदरामुळे इंधनाचे आयातमूल्य कमी होऊन भारतामधील इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. चाबहार बंदराचा एक मोठा फायदा म्हणजे मध्यपुर्वेत आणि मध्य आशियाशी व्यापार करण्यासाठी भारताला नवा मार्ग उपलब्ध होणार आहे. रशिया, मध्य आशियातील उझबेकिस्तान, किरगिझिस्तान, ताजिकिस्तान अशा देशांपर्यंत भारत पोहोचू शकेल.

 नवी दिल्ली, दि.8- इराणमध्ये भारत विकसित करत असलेले चाबहार बंदर दोन्ही देशांसाठी सुवर्णसंधीचे द्वार उघडेल असे विधान केंद्रीय जहाजबांधणी आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी नुकतेच केले. इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्या शपथविधीसाठी ते उपस्थित राहिले होते. त्यानंतर त्यांनी हे विधान केले होते. पुढच्याच वर्षी या बंदरावरुन मालाची आयात निर्यात सुरु होईल असे गडकरी यांनी स्पष्ट केले होते. चाबहार बंदर भारतासाठी व्यापारी तसेच सामरिकदृष्ट्याही उपयुक्त ठरणार आहे. 2016 साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इराणच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी या बंदराच्या विकासाच्या करारावर स्वाक्षरी केली होती.

 चाबहारमध्ये शहिद कलंतरी आणि शहिद बेहेष्ती अशी दोन बंदरे आहेत आणि दोहोंमध्ये प्रत्येकी पाच धक्के असतील. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, गुजरात कांडला पोर्ट ट्रस्ट आणि जहाजबांधणी मंत्रालय येथे दोन शिपिंग कंटेनर बर्थ बांधत आहेत. या बर्थची लांबी 640 मी असेल. तसेच तीन मल्टी कार्गो बर्थसाठी साडेआठ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे.

भारताला सर्वात मोठ्या प्रमाणात आयात करावी लागणारी वस्तू म्हणजे इंधन. चाबहार बंदरामुळे इंधनाचे आयातमूल्य कमी होऊन भारतामधील इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी इराणवर बंधने घातल्यानंतर भारताने इराणकडून आयात केल्या जाणाऱ्या इंधनात वाढ केली. आता या बंदरामुळे ही आयात आणखी वाढू शकेल. इंधनाप्रमाणे कोळसा, साखर व तांदुळाचा व्यापारही आता चाबहारमुळे सोपा होणार आहे. चाबहार बंदराचा एक मोठा फायदा म्हणजे मध्यपुर्वेत आणि मध्य आशियाशी व्यापार करण्यासाठी भारताला नवा मार्ग उपलब्ध होणार आहे. अफगाणिस्तानला कोणतीही मदत किंवा व्यापार करताना पाकिस्तानचा येणारा अडथळा आता दूर होणार आहे. त्याचप्रमाणे रशिया, मध्य आशियातील उझबेकिस्तान, किरगिझिस्तान, ताजिकिस्तान अशा देशांपर्यंत भारत पोहोचू शकेल.
 चीनचा अरबी समुद्रामधील वाढता वावर पाहता भारतालाही येथे आपले स्थान निर्माण करण्याची गरज होती. चाबहार बंदरामुळे भारताला अरबी समुद्रक्षेत्रामध्ये भक्कम स्थान प्राप्त होईल. चीन पाकिस्तानमध्ये ग्वादर बंदर बांधत आहे. हे बंदर चाबहार पासून समुद्रमार्गे केवळ 100 किमी अंतरावर आहे. त्यामुळे नाविक शक्तीमध्येही इराण आणि भारत यांना एकजूट दाखवून देता येईल.

चाबहारचे महत्त्व

चाबहार हे बंदर सिस्तान-बलुचिस्तान प्रांतामध्ये आहे. चाबहारचा इतिहास ख्रिस्तपुर्व 2500 वर्षांपासूनचा असून अलेक्झांडर, मंगोलांनीही येथे सत्ता गाजवलेली होती. भारत अफगाणिस्तान आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या त्रिपक्षीय करारामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अफगाणिस्तानच्या बामियान प्रांतापासून चाबहार पर्यंत रेल्वेमार्ग बांधण्यात येत आहे, तसेच काबूलपासून 130 किमी अंतरावरील हाजिगाक कोळसा क्षेत्रात कोळसा उत्खननाचे हक्कही भारताला मिळाले आहेत. चाबहार-मिलाक-झारांज-दिलाराम असा रस्ता भारत बांधत असल्यामुळे अफगाणिस्तानसोबतही भारताचा व्यापार वाढणार आहे. इराण-पाकिस्तान- भारत या वायूवाहिनी प्रकल्पाचे काम रखडल्यानंतर भारत आणि इराण अरबी समुद्रातून वायू वाहिनी नेण्याचे प्रयत्न करत आहेत. यामुळे पाकिस्तानला शह बसणार आहे.

Web Title: How Chabahar would help India ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.