कोरोनाचा नवा सबव्हेरिएंट JN 1 किती धोकादायक?; WHO नं जारी केली अॅडव्हायजरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 07:29 AM2023-12-20T07:29:49+5:302023-12-20T07:31:18+5:30
WHO सातत्याने या व्हेरिएंटच्या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. त्याचसोबत WHO ने लोकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे
नवी दिल्ली - Coronavirus New Subvariant(Marathi News) कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटनं पुन्हा एकदा जगात चिंता पसरली आहे. या व्हेरिएंटबाबत जागतिक आरोग्य संघटना(WHO)यांनी निवेदन जारी केले आहे. कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट जेएन १ ला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’च्या यादीत टाकले आहे.वाढत्या थंडीच्या दिवसात JN 1 व्हेरिएंटच्या संक्रमणाचा धोका बळावला आहे. परंतु या व्हेरिएंटमुळे लोकांना फारसे नुकसान होणार नाही असंही WHO ने स्पष्ट सांगितले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जेएन १ आरोग्यासाठी धोकादायक नसून सध्या अस्तित्वात असलेली व्हॅक्सिन यापासून संरक्षण करण्यास सक्षम असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.
WHO सातत्याने या व्हेरिएंटच्या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. त्याचसोबत WHO ने लोकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यात म्हटलं आहे की, लोकांनी गर्दीच्या, बंद किंवा खराब हवेच्या ठिकाणी मास्क घालावे. तसेच शक्यतोवर इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवा. आरोग्य कर्मचारी आणि मेडिकल संबंधित लोकांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्क परिधान करावे. पीपीई किट घालून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करा. व्हेंटिलेटरची सुविधा गरजेनुसार उपलब्ध करून ठेवा असं सांगण्यात आले आहे.
अलीकडेच दक्षिण भारतातून परतलेल्या २ महिलांना कोरोना झाल्याचे समोर आले. गुजरातच्या गांधीनगरमध्ये राहणाऱ्या या महिलांना होम आयसोलेट करण्यात आले आहे. केरळमध्ये JN 1 व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्यानंतर दक्षिण भारतातून प्रवास करणाऱ्या लोकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. गुजरातच्या या २ महिलांचे सॅम्पल जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहेत. या दोन्ही महिलांना मागील २-३ दिवसांपासून सर्दी आणि खोकला अशी लक्षणे दिसत होती. ५७ आणि ५९ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलांना कोरोना व्हॅक्सिनचे २ डोस घेतले आहेत. त्याचसोबत या महिलांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही ट्रेस केले जात आहे.
अमेरिकेत ८ डिसेंबरला आढळला पहिला रुग्ण
यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एन्ड प्रिवेंशननं या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, ८ डिसेंबरपर्यंत अमेरिकेत वाढलेल्या १५ ते २९ टक्के कोरोना रुग्णांसाठी व्हेरिएंट जेएन १ जबाबदार आहे. जेएन १ पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यात आढळला. मागील आठवड्यात चीनमध्ये कोरोनाच्या या व्हेरिएंटचे ७ रुग्ण सापडले आहेत.